शिरपूर-शहादा राज्य महामार्ग हा महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशला जोडणारा एक महत्त्वपूर्ण मार्ग असून, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांसह संपूर्ण खान्देशाला जोडणारा राजमार्ग आहे. परंतु त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशातच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने किरकोळ अपघात होत असतात.
महामार्गालगत वाघाडी, अर्थे, विखरण, वरुळ, भटाणे, तऱ्हाडी, आदी गावे असून, तेथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होते. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत. वारंवार अपघात होऊनदेखील खड्डे बुजविले जात नाहीत. खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. या महामार्गाची दुरूस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
शिरपूर शहादा महामार्गावर अनेक पुलांना कठडे नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.