जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. याआधी नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. ७ डिसेंबरपासून जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प प्रमाणात होती. मात्र आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. मागील १० महिन्यांपासून घरीच असल्यामुळे विद्यार्थीही कंटाळले होते. त्यामुळे आता शाळा सुरू होणार असल्यामुळे ते आनंदी झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला असल्याची माहिती पालकांनी दिली. तसेच ऑनलाईन शिक्षण घेत असतानाच मुलांमध्ये मोबाईल खेळण्याचे प्रमाण वाढले होते. प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षकांच्या धाकामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होतो. मात्र घरी असताना अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. वर्ग कधीपासून सुरू करायचे त्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघता ७ डिसेंबरपासून नववी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आता मात्र उपस्थिती वाढली आहे.
प्रतिक्रिया
माझा मुलगा इयत्ता आठवीला आहे. शाळा दिवाळीनंतरच सुरू होणे अपेक्षित होते. सर्व खबरदारी घेऊन पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळेनेही योग्य काळजी घ्यावी.
- अशोक बडगुजर, पालक, अवधान
माझा मुलगा सातवीला आहे. कोरोनाचे नियम पाळून मुलाला शाळेत पाठवणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवणे गरजेचे आहे. मुलाला शाळेत पाठवताना मास्क देणार आहोत.
राकेश पाटील, पालक, अवधान
ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण जास्त प्रभावी आहे. शिक्षकांच्या धाकामुळे मुलांचा अभ्यास चांगला होतो. पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळांनीही उपाययोजना कराव्यात.
- प्रमोद पाटील, धुळे
संयुक्त तपासणी केली जाईल
पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. तालुका आरोग्याधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळांची संयुक्त तपासणी करणार आहोत. तसेच पालकांचे संमतीपत्र घेणार आहोत.
मनीष पवार, शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या
पाचवी - ४३३९१
सहावी - ४०८७७
सातवी - ४०९२४
आठवी - ३९५६४
जिल्ह्यातील शाळांची संख्या - ११५३
जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या - ४०६५