देवेंद्र पाठक,धुळे : वाळूची अवैध वाहतूूक करताना पकडल्याचा राग आल्याने शिरपूर येथील तलाठ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना शिरपूर तालुक्यातील जवखेडाअंतर्गत नवे लोंढरे गावात सोमवारी घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
शिरपूर तहसील कार्यालयाचे तलाठी सुरेश तुकाराम ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सहकारी अनिरुद्ध बेहरे यांच्यासह जवखेडाअंतर्गत नवे लोंढरे गावात तलाठी ठाकरे गेले होते. या ठिकाणी अवैधपणे वाळूची वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला अडविण्याचा प्रयत्न तलाठी आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी यांनी केला. यावेळी ट्रॅक्टरमालकासह चालकाने शिवीगाळ करीत तलाठीची कॉलर पकडून धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणला. जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिघांनीही पळ काढला. अशा आशयाची फिर्याद शिरपूर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री दाखल झाली. त्यानुसार तीन जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.