गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केलेली असली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू ठेवली आहे. एसटीला जिल्हाबंदीची अट नसली, तरी प्रवासीसंख्या २२ पेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट घालून देण्यात आलेली आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंदणी केली जात आहे. दिव्यांगासह एक प्रवासी प्रवास करू शकतो. सर्वसामान्यांना प्रवासास बंदी आहे. मात्र, अत्यावश्यकच असल्यास त्यांना प्रवास करू दिला जातो. मात्र, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. यासाठी महापालिका, नगरपालिकेेचे आरोग्य पथक प्रत्येक आगारात नियुक्त केलेले आहे.
लॉकडाऊन जाहीर केल्याने, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार नाही. त्यातच लॉकडाऊन वाढल्यास खायाचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाल्याने, बहुतेकांना आता घरी जाण्याचे वेध लागलेले आहे. जिल्हाबंदीमुळे इतर मालवाहतूक व्यतिरिक्त इतर वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे.त्यामुळे प्रवाशांनाही एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रवासासाठी प्रवासीही तीच ती कारणे सांगू लागले आहेत.
धुळे जिल्ह्यात केवळ ५ आगार असून, त्यापैकी चार आगारांतर्फेच बसगाड्या सोडण्यात येत आहे. यात धुळे आगारातून नाशिकसाठी दोन-तीन फेऱ्या व जळगावसाठी एक फेरी होते, तर साक्री, शिरपूर, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी एक-दोन फेऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागाासाठी एकही फेरी सुरू नाही. साधारत: सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी होते. प्रवाशांअभावी बस स्थानकातही शुकशुकाट असतो.
कारणे सारखीच
साहेब, घरी आई-वडील आजारी असून, त्यांना भेटायला जायचे आहे.
शहरात रोजगारच राहिलेला नाही, त्यामुळे आता गावीच काहीतरी कामधंदा करू, म्हणून जायचे आहे.
गावाकडे शेतीची कामे बाकी आहेत.
लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.
नाशिक, जळगाव मार्गावरच गाड्या
धुळे जिल्ह्यातील आगारामार्फत मोजक्या गाड्या सोडल्या जात आहे. त्यात धुळ्यातून नाशिक, जळगावसाठी तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी बस सोडण्यात येत आहे. मात्र, या सर्व बसगाड्यांमध्ये २२ प्रवासी बसविले जात आहे. सध्या प्रवासी संख्या रोडावल्याने, फक्त एक-दोन फेऱ्या होत आहे. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांशी वाद
सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवताना राज्य शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासावे लागत आहे. जे सर्वसामान्य प्रवासी असतील, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारून घ्यायचा आहे. मात्र, काही प्रवासी ओळखपत्रही दाखवित नाही, होमक्वारंटाइनचा शिक्का मारण्यासही नकार देतात. त्यामुळे अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांशी प्रवासी वाद घालत असल्याचे सांगण्यात आले.