दरम्यान, नांदर्डे किंवा बोराडी परिसरात बिबट्या नसून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच या परिसरात वृक्षतोड किंवा शिकारीस बंदी असून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांनी वनक्षेत्रात घाण टाकू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिरपूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव व वनक्षेत्रपाल भूषण पाटील यांनी दिला आहे.
शनिवारी रात्री बिबट्याच्या अफवेमुळे बोराडी, नांदर्डे परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत होते. त्यातच १६ रोजी रात्री १०.४५ वाजता वाडी वनक्षेत्राचे वनपाल पी. एच. माळी यांना फोन आला की, बोराडी नांदर्डे शिवारात बिबट्यासदृश प्राणी दिसला आहे. वनपाल माळी यांनी सहकारी वनरक्षक सविता बोरसे, वनमजूर कैलास पावरा, शांताराम भिल यांच्यासह घटनास्थळी पाहणी करून परिसरातील ग्रामस्थांकडून बिबट्या कुठून कुठे गेला, याची माहिती घेतली.
शेतातून पुढे गेल्यानंतर त्यांना एक तरस दिसले. ते तरस बिबट्यासारखे दिसत असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. परंतु तो बिबट्या नसून बिबट्याप्रमाणे दिसणारा तरस हा प्राणी असल्याचे लक्षात आल्यावर वनपाल माळी यांनी फोटो काढण्यासाठी मोबाईल काढला असता भरधाव वेगाने तरस पळत सुटले. त्यामुळे छायाचित्रही घेता आले नाही. तसेच तो बिबट्यासदृश प्राणी बिबट्या नसून तरस असल्याबाबत माळी यांनी जमलेल्या लोकांना सांगितल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, परंतु खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनपाल पी. एच. माळी यांनी नागरिकांना केले आहे.
नांदर्डे नर्सरी ते घाटी परिसर व इतर जंगलात वृक्षतोड करणे, प्राण्यांची शिकार करणे, वनचराई यावर बंदी आहे. तसेच शिरपूर - बोराडी या रस्त्याने ये-जा करणारे वाहन वाहनातील कचरा किंवा इतर साहित्य जंगलात फेकून जातात. यामुळे प्रदूषण निर्माण होऊन जंगल कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी गस्ती पथक वाढविण्यात आलेले आहे. या पथकास वरील प्रकार आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा वन विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव, वनक्षेत्रपाल भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. एच. माळी, वनरक्षक सविता बोरसे, वनमजूर कैलास पावरा, शांताराम भील, शिवराम पावरा यांच्या पथकाने नांदर्डे ते बोराडी घाटी परिसरात बिबट्याला शोधण्यासाठी रात्रभर शोधमोहीम राबविली.