धुळे : येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी नावनोंदणीत हेराफेरी होत असल्याचा आणि शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची मागच्या दाराने नावनोंदणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत झाली. धुळे शहरात विधी महाविद्यालयाजवळ असलेल्या धुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात हमीभावाने धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरु झाली आहे. यासाठी धुळे तालुक्यातील बोरकुंड, हडसुणे, कुसुंबा, दोंदवाड, विंचूर, वडगाव, विसरणे यांसह अनेक गावातील शेतकरी मका, ज्वारी आदी धान्य विक्रीसाठी गेल्या आठवड्यापासून कार्यालयात खेटा घालत होते. परंतु ऑनलाईन नोंदणी असल्याने आणि सर्वर चालत नसल्याने सोमवारी नावनोंदणी करण्यात येईल, असे संबंधित कार्यालयाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. परंतु शेतकऱ्यांची नोंदणी सुरु होण्याआधीच ७० ते ८० जणांची नोंदणी झाल्याचे या शेतकऱ्यांना समजले. शुक्रवारपासून चकरा मारणारे शेतकरी सकाळपासून रांगेत उभे असताना त्यांच्यापुढे अचानक इतके नंबर लागले कसे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु फेडरेशनच्या कार्यालयातील कर्मचारी दाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना तोंडी सांगितली. त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव यांनी फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोनवणे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले आणि नव्याने शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची आदेश दिले. त्यानुसार नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरु झाली असून, शेतकऱ्यांची नावनोंदणी करुन त्यांना टोकन देण्यात येत आहे.याबाबत वडगावचे शेतकरी रघुनाथ पाटील यांनी सांगितले की, हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी वशिलेबाजी चालते. पुढाऱ्यांनी सुचविलेली नावे आधी घेतली जातात. तसेच काही व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे सातबारा उतारे असतात. हे व्यापारी फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन आधीच नंबर लावून घेतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हमीभावापासून वंचित राहू शकतात. याबाबत विचारणा केली असता तुम्ही कुठेही तक्रार केली तरी काही होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.जिल्हाधिकारी कार्यालयात माधवराव चैत्राम पाटील, युवराज नामदेव पाटील, योगेश्वर युवराज पाटील, शांतीलाल आनंदा चाैधरी, सीताराम बापू पाटील, संदीप रामराव पाटील, पुंजू मुकुंदा पाटील, रंगराव गोरख देसले यांच्यासह २० ते ३० शेतकरी उपस्थित होते. त्यांचा प्रश्न सुटल्याने दिलासा मिळाला.
मार्केटिंग फेडरेशनमध्ये हेराफेरी, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:38 IST