लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना योध्द्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करुन द्यावीत, ५० लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करावे यासह इतर मागण्यांसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील दहा हजारापेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांनी काळ्या फिती लावून काम करीत शासनाचे लक्ष वेधून घेतले़ मागणी दिवस पाळण्यात आला, अशी माहिती सिटू संघटनेचे अध्यक्ष कॉ़ एल़ आऱ राव यांनी दिली़अशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यासह केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, सार्वजनिक आरोग्यासाठी जीडीपीच्या पाच टक्के निधी खर्च करावा, आरोग्य सेवांचे खाजगीकरण बंद करावे, सार्वजनिक आरोग्य सुविधा हक्क लागू करावा, महागाई भत्ता गोठविण्याचा निर्णय रद्द करावा, वेतन कपातीचे धोरण मागे घ्यावे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल रद्द करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिटू संघटनेचे जनरल सेके्रटरी कॉ़ शरद पाटील यांनी दिली़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना योध्दे प्राणाची बाजी लावून लढत आहेत़ त्यामध्ये ५४८ डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, हजारापेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे़ या व्यतिरिक्त आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, वार्ड बॉय, आरोग्य कर्मचारी, टेस्ट कंट्रोल कामगार, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, पॅरॉमिलीटरी सैनिक, किचन कामगार, अन्नपाणी, बँक, औषधे इत्यादी अत्यावश्यक सेवेत काम करणारे कामगार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामगार यांना देखील विषाणूची लागण झाली आहे़ यापैकी काहींना प्राण गमवावे लागत आहेत़ बहुतेकांना पुरेशी साधने दिली नसल्याने लागण होत आहे़
कोरोना योध्द्यांना विम्याचे सुरक्षा कवच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 21:30 IST