धुळे : भाजी मार्केटसाठी पर्यायी जागा द्यावी या मागणीसाठी देवपूरातील भाजीपाला विक्रेत्यांनी निदर्शने केली़ त्वरीत पूनर्वसन न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे़धुळे शहरात देवपूरातील एसएनडीटी महिला महाविद्यालयाजवळ मोकळ्या मैदानात गेल्या काही वर्षांपासून मोठा भाजीपाला बाजार भरतो़ देवपूरातील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी हा बाजार सोयीचा आहे़ परंतु भविष्यात या जागेवरुन भाजीपाला विक्रेत्यांना हटवीले जाणार आहे़ त्यामुळे येथील विक्रेत्यांनी महापौरांची भेट घेवून पर्यायी जागेची मागणी केली होती़ त्यावेळी जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले होते़दरम्यान, या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू झाले आहे़ हे काम पूर्ण झाल्यावर बाजार भरवणे शक्य होणार नसल्याने येथील भाजीपाला विक्रेत्यांनी बाजाराच्या जागेवरच निदर्शने केली़यावेळी सुरेखाबाई भोई, नितीबाई माळी, रियाज खाटीक, जमील शेख, सतीश मराठे, सुनील महानोर, सतीश बडगुजर, बापू हेवारे, बबलू माळी यांच्यासह विक्रेते सहभागी झाले़कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ या विषाणूचा संसर्ग दीर्घकाळ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ त्यामुळे भविष्यात देखील गर्दी टाळणे आणि फिजीकल डिस्टन्सिंग ठेवणे काळाची गरज आहे़ एकाच ठिकाणी भाजीबाजार असल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होते़ त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात भाजीबाजार विकसीत करण्याचे नियोजन पालिकेने केले तर गर्दी कमी करणे शक्य होणार आहे़
भाजीपाला विक्रेत्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:37 IST