दरम्यान प्रशासनाने सार्वजिनक कार्यक्रमांवर मर्यादा घातलेली असली तरी शिवप्रेमींच्या उत्साहामध्ये तुसभरही कमी झालेली नाही. शहरासह जिल्ह्यात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये मोठमोठे भगवे ध्वज लावण्यात आलेले आहे. अनेकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वहनांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले मोठमोठ्या आकाराचे ध्वज लावलेले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून वातावरण निर्मिती झालेली आहे. एवढेच नाही तर लहान मुलांनीही आपल्या सायकलींना भगवे ध्वज लावलेले आहे. चिमुकल्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे.
बाजारपेठेत गर्दी
शहरातील नवीन महानगरपालिका, जुना आग्रारोड, देवपूर परिसर, फुलवाला चौक, पारोळा चौफुली, जुने जिल्हा रुग्णालय आदी भागात ध्वज, भगवे टी-शर्ट, आदी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे. हे साहित्य खरेदी करण्यााठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे. तसेच महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शुभेच्छा फलकांनी शहर व्यापले
धुळे शहरात प्रत्येक वर्दळीच्या चौकांमध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर, फलकांनी संपूर्ण शहर व्यापलेले आहे. काही ठिकाणी लावलेले भलेमोठे बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून येते.
रोशणाईने पुतळा परिसर उजाळला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या तसेच पारोळा चौफुलीवर असलेल्या शिवाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोशणाई करण्यात आलेली आहे. या विद्युत रोशणाईमुळे पुतळ्यांचा परिसर रात्रीच्यावेळी उजळून निघालेला आहे.
अभिवादनासाठी होणार गर्दी
शहरात विविध भागात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.