गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:46 PM2020-07-08T22:46:13+5:302020-07-08T22:46:32+5:30

एलसीबीची कारवाई : टीकटॉक व्हीडीओमुळे सापडले संशयित

Police arrested three persons carrying village pistols | गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले

dhule

Next

धुळे : गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी धुळे शहरातील तीन संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे़ तिघांकडून दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत़ गेल्या दोन महिन्यात धुळे शहर, शिरपूर आणि एलसीबी पोलिसांनी सात गावठी पिस्तुल जप्त करुन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत़ पोलिसांच्या हाती लागेल्या पिस्तुलांची संख्या आता नऊ झाली आहे़
धुळे एलसीबीच्या या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजु भुजबळ आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रसारमाध्यमांना माहिती दिली़
एलसीबीच्या या कारवाईचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले असून प्रशस्तीपत्र देण्याबाबत शिफारस करण्याचे जाहीर केले़
पिस्तुल हातात बाळगलेल्या एका तरुणाचा टीकटॉक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता़ व्हीडीओमधील पिस्तुल गावठी बनावटीची खरी पिस्तुल असल्याचा संशय आल्याने पोलीस याबाबत तपास करीत होते़ दरम्यान, बुधवारी दुपारी दिपक सुरेश शिरसाठ (रा़ साक्री रोड धुळे) हा तरुण गावठी पिस्तुल हातात घेऊन भिमनगर जवळ साक्री रोडवर फिरत असल्याची माहिती एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ त्यानुसार एलसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराला सापळा रचून दिपक शिरसाठला पिस्तुलसह ताब्यात घेतले़ त्याच्याकडून ३५ हजार ५०० रुपये किंमतीचे पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले आहे़
संशयित दिपक शिरसाठची अधिक चौकशी केली असता, पंकज परशराम जिसेजा (रा़ पद्मनाभ नगर, साक्री रोड धुळे) याने त्याला सदर पिस्तुल दिल्याची कबुली दिली़ त्यानंतर पोलिसांनी जिसेजाला ताब्यात घेवून विचारपूस केली़ अभय दिलिप अमृतसागर (३०, रा़ कुंडाणे ता़ धुळे) याला देखील एक पिस्तुल दिल्याची कबुली त्याने दिली़ त्यामुळे पोलिसांनी अभय अमृतसागर याला देखील ताब्यात घेतले़ त्याच्याकडून ३६ हजार रुपये किंमतीचे एक पिस्तुल आणि दोन काडतुस जप्त करण्यात आले़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील, संजय पाटील, पोलीस नाईक प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली़
संशयितांविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़
खुनाच्या गुन्ह्यात दोन संशयित
४पिस्तुलसह पकडलेल्या तिघांपैकी दोन संशयित सराईत गुन्हेगार आहेत़ पंकज जिसेजा याच्याविरुध्द २०१८ मध्ये धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि खुनाचा असे दोन गुन्हे दाखल आहेत़ तर अभय अमृतसागर याच्याविरुध्द देखील २०१८ मध्ये धुळे तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे़
जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन महिन्यात नऊ पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहेत़ पिस्तुल बाळगणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून त्यामुळे विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे भविष्यात मोठी कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले़ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सिमाभागात गावठी पिस्तुलचा कारभार चालतो़ यासंदर्भात एमपी पोलिसांशी आम्ही संपर्कात आहोत़ कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आल्यानंतर सिमा भागात संयुक्त कारवाई केली जाणार आहे़

Web Title: Police arrested three persons carrying village pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे