धुळे : कृषी समितीच्या प्रत्येक बैठकीत जिल्ह्यातील आदर्श, प्रगतिशील उपक्रमशील शेतकरी यांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करीत त्यांचा अनुभव, मार्गदर्शनाचा, शेतीतील विविध उपक्रमांचा, तंत्रज्ञानाचा लाभ इतर शेतकऱ्यांना करून देणे हा स्तुत्य उपक्रम राबविणारा धुळे कृषी विभाग हा राज्यातील पहिला विभाग आहे, असे प्रतिपादन कृषी भूषण अॅड. प्रकाश पाटील केले.
जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन समितीची रब्बी हंगाम आढावा बैठक नुकतीच झाली. अध्यक्षस`थानी कृषी सभापती रामकृष्ण खलाणे होते. शेतात विविध नवनवीन उपक्रम राबविणारे, सेंद्रीय शेतीतून फळे, भाजीपाला आदींचे भरघोस उत्पन्न मिळविणारे प्रगतीशील आदर्श शेतकरी नरेंद्र नथ्थु माळी(कापडणे), महिला शेतकरी शोभाबाई जाधव(निमडाळे) यांचा कृषी- पशुसंवर्धन सभापती खलाणे, कृषी विकास अधिकारी पी. एम. सोनवणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या बैठकीत रब्बी हंगाम आढावा, कृषीकर्ज, पीक विमा योजना, सेंद्रीय शेती, शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, विजेचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी समिती सदस्या संजीवनी सिसोदे, सदस्य भीमराव ईशी, जिल्हा कृषी अधिकारी यु. टी. गिरासे, कावेरी राजपूत, जिल्हा अग्रणी बँकचे सरव्यवस्थापक एम .के. दास, कृषीतंत्र अधिकारी सी. जी. ठाकरे, प्रभारी मोहीम अधिकारी, अभय कोर, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते. साक्रीचे तालुका कृषी अधिकारी आर. एन. नेतनराव यांनी सूत्रसंचालन केले.