मुदत संपलेल्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली़ यांपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी १५ ला मतदान घेऊन १८ ला निकाल जाहीर करण्यात आला़ अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे; तर बहुतांश ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे़ तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता बसणार आहे़
महाआघाडी सरकारने सरपंचपदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे या निवडणुकीत युवकही उत्साहाने सहभागी झाले होते़ अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे़
आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे़ सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे तालुकास्तरावर, तर महिला आरक्षण जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे़ आरक्षण सोडतीनंतर सरपंचपद निवडीसाठी घडामोडींना वेग येणार आहे़ जिल्हा प्रशासनाने २७ रोजी तहसील स्तरावर, तर २९ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर महिला आरक्षण सोडत काढण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे़ मात्र जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडतीच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही़ जिल्हाभरातील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे लक्ष आता सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे़
सदस्य निघाले वारीवर
मतमोजणीच्या दिवशीच बहुतांश गावातील नवनिर्वाचित सदस्य व सदस्यांचे पतिराज गावात न थांबविता पॅनल प्रमुख त्यांना फिरायला घेऊन गेले. जोपर्यंत सरपंच आरक्षणाची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत ते सदस्य बाहेरगावी थांबण्याची शक्यता आहे़
मतदानाचे पर्याय
सरपंचपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर अशा वेळी हजर सदस्यांचे मतदान घेण्याचा नियम आहे़ त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित सदस्यांचे आवाजी, हात वर करून किंवा गोपनीय चिठ्ठी पद्धतीने मतदान घेतात़ मतमोजणी झाल्यानंतर जास्त मते मिळविणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली़
सत्तेचे समीकरण
जुळविणे सुरू
ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थित व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत़ यांपैकी कोणाची सरपंच, उपसरपंचपदी वर्णी लावायची याचे समीकरण तयार करण्याचे काम निवडणुका झालेल्या गावांमध्ये सध्या सुरू आहे़ हे समीकरण जुळविताना कुणी नाराज तर होणार नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागत असल्याने प्रमुखांचीही चांगलीच दमछाक होत आहे़
कोण होणार गावचा कारभारी?
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून आपल्या गावाचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांची निवड केली़; पण आता गावाचा सरपंच कोण होणार याकडे नजरा लागल्या आहेत़ निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागणार आहे, त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे़