जिल्हा मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त घोषित झाला आहे. सर्व कुटुंबांकडे शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, या शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, आदी उपक्रमांचे जिल्हा स्तरावरून आयोजन करून जाणीव जागृती केली जात आहे.
याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये गाव हागणदारी मुक्त घोषित करणे या उपक्रमात गावचा हागणदारी मुक्त ग्रामपंचायतींचा दर्जा कायम ठेवून, त्यात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हागणदारी मुक्त अधिक ओडीएफ प्लस हा उपक्रम राबून १५ ऑगस्ट २०२२ अखेर जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीतील ६७५ गावे टप्प्याटप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करावयाच्या आहेत. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी विविध समाज माध्यमांद्वारे जाणीव जागृती करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता श्रमदान फेरी, स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत गाव व परिसरातील स्वच्छतेसाठी ग्रामस्थांमार्फत श्रमदानाद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वच्छ ग्रहीना गौरविण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित स्वच्छतेविषयक चर्चासत्रात जिल्ह्यातील काही सरपंचांना सहभागी होता येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे.
स्थायित्व सुजलाम या शंभर दिवसांचे उपक्रम अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शोषखड्डे खोदकाम व बांधकाम, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शौचालय उपलब्ध नसणाऱ्या कुटुंबांना शौचालय उपलब्धी हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त शाश्वत स्वच्छता या विषयावर दृक-श्राव्य माध्यमाद्वारे गावातील पदाधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. नवा संकल्प या उपक्रमाअंतर्गत कुटुंबस्तरावर कचरा विलगीकरण, शोषखड्डा व सेफ्टी टँक रिकामे करणे, प्लास्टिक वस्तूंचा वापर न करणे याबाबत सर्व ग्रामपंचायतींमध्ये २ ऑक्टोबर रोजी संकल्प करण्यात येऊन याबाबत शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजूषा हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी केले आहे.