शहरातील गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर रुग्णांसाठी वापरले गेलेले इंजेक्शन, सलाइन, हॅण्डग्लोव्ज भर रस्त्यात पडलेले आढळून आले. घनकचऱ्याबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेकडून सुका कचरा, ओला कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविते, तशीच जैविक कचरा संकलनासाठी यंत्रणा आहे. कचरा संकलनाची सुविधा असताना वापरलेली इंजेक्शन्स, सलाइन आणि हॅण्डग्लोव्ज रस्त्यावर फेकण्याचे धाडस केले जात आहे. कोरोना महामारीच्या आजारापासून जिल्हा सावरत असताना, अशा प्रकारच्या कृत्यामुळे पुन्हा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सध्या पावसाळ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफाइड अशा रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, डोकेदुखी, थंडी, अंगदुखी अशा साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
काहीही असले, तरी उघड्यावर पडलेल्या जैविक घनकचर्यामुळे रस्त्यावरून जाणार्या निरोगी नागरिकांना संबंधित रुग्णाच्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मनपाने जैविक घनकचरा संकलनाचे नियोजन करावे. सामान्य नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.