रुग्णालयात धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून उपचारासाठी रुग्ण येतात. कोरोना विषाणूच्या कालावधीत रुग्णालयाने रुग्णांवर औषधोपचार केले. त्यामुळे कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाविद्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकचा सर्वसामान्य रुग्णांना लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने उभारलेल्या ऑक्सिजन टँक, कोरोना अतिदक्षता विभाग, कोरोनापश्चात आजारी रुग्णांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण सेवा विभाग, डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.