धुळे : महानगरपालिकेतील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गैरव्यवहार व निधीच्या अपव्ययाबाबत राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त, समाजकल्याण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात दलित वस्ती सुधार योजना (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत विकास करणे) अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. सदर निधी हा दलित वस्तीमधील रस्ते, गटारी, संरक्षण भिंत, सभागृह यासाठी वापरावा हे शासनाला अभिप्रेत होते. परंतु महानगरपालिकेने सदर निधी हा दलित वस्तीमध्ये न खर्च करता इतरत्र त्याचा वापर केला आहे. त्यामुळे शहरातील दलित, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, नवबौध्द या समाजावर अन्याय झाला आहे. यासंदर्भात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. सदर तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, ग्रामीण अध्यक्ष धनंजय शिरसाठ आदी सहभागी होते. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी सदर आदेश दिले आहेत. सदर आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे.