धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लसीकरणात जिल्ह्याने बाजी मारली होती. प्राप्त उद्दिष्टापैकी ९७.२५ टक्के इतके लसीकरण करण्यात आले होते. जिल्ह्यासाठी ४०० जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी ३८९ जणांना लस टोचण्यात आली होती, तर ११ जण अनुपस्थित राहिले होते. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला होता. लसीच्या एका बाटलीतून १० जणांना लसीचा डोस देता येतो. बाटली फोडल्यानंतर दहा पैकी काही डोस उरले तर ते वाया जातात. आतापर्यंत जिल्ह्यात आठ डोस वाया गेले आहेत. पहिल्या दिवशी लसीकरण झाले त्यावेळी एक व मंगळवारी दुसऱ्यांदा लसीकरण झाले त्यावेळी सात डोस वाया गेले आहेत. आतापर्यंत दोनदा लसीकरण झाले आहे. पहिल्या दिवशी ३८९, तर मंगळवारी ३१३ जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. सर्वत्र लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी राहिले आहे. साधारणतः १० टक्के डोस वाया जातात. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ आठ डोस वाया गेले आहेत.
घाबरू नका -
* कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेताना घाबरू नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
* कुठलीही लस घेतली तर त्याची लक्षणे दिसत असतात. कोरोनाची लस घेतल्यानंतरदेखील काही जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
८०० - डोस मिळाले जिल्ह्याला
८ - डोस गेले वाया
३८९ - जणांना दिले पहिल्या दिवशी डोस
११ - जण राहिले अनुपस्थित