पिंपळनेर उपबाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांदा लिलाव बंद होता. बाजार समितीने नोटीस देऊन व्यापाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वीच १७ व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन कागदपत्रांची फाईल जमा केली होती. तरीदेखील कांदा लिलाव तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. तसेच बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे मागील थकबाकी जमा करण्याचा आग्रह धरल्याने १७ व्यापारी सदस्यांनी थकीत असलेल्या बाकीचा धनादेश सचिव अशोक मोरे यांच्याकडे दिला. त्यानंतर उपबाजार समिती व व्यापाऱ्यांमध्ये समेट होत येत्या ४ मेपासून कांदा लिलाव सुरू करण्याचे ठरविण्यात आले. सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत लिलाव होईल, दुपारनंतर लिलाव होणार नाही असे ठरले आहे. या वेळी व्यापारी किरण कोठावदे, नासिर सय्यद, भाऊसाहेब मराठे, हेमंत कोठावदे, संदीप पाटील, अमोल पाटील, हर्षद काकुस्ते, नीलेश चौधरी, लक्ष्मण पाटील व शाखा प्रमुख संजय बावा आदी उपस्थित होते. तसेच १७ अधिकृत व्यापारी सदस्य यांना उपबाजार समिती लवकरच लायसन देणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणारा कांदा लिलाव तब्बल दोन महिने उशिराने सुरू होणार आहे.
उपबाजार समितीत ४ मेपासून कांदा लिलाव सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST