राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत आ.कुणाल पाटील यांनी बैठकिचे आयोजन केले होते. शिक्षण मंत्री यांच्या निवासस्थानी शुक्रवारी ही बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रंथपाल विभाग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकित ग्रंथपाल संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या मागण्या शिक्षण मंत्र्यांसमोर मांडल्या. त्यात राज्यातील ग्रंथपाल गेल्या २४ वर्षापासून अर्धवेळ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही शासकिय सेवा शर्तीचा लाभ मिळत नाही. सर्व सेवाशर्तीचा लाभ मिळावा व त्यांचे पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून समायोजन करण्यात यावे, सन २००६ साली पूर्णवेळ झालेल्या ग्रंथपालांना त्यांची अर्धवेळ झालेली सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी योग्य तो बदल शासन निर्णयात व्हावा, बी.लिब. पदवीधारक ग्रंथपालांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेतनश्रेणी लागू केल्या गेल्या आहेत. त्यामुळे शोभू शंकर चव्हाण यांच्या कोर्ट निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू केल्यास त्यात एकसुत्रीपणा येईल अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
त्यानुसार अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ करण्यासाठी अहवाल मागवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल व ग्रंथपालांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकित सांगितले.
यावेळी ग्रंथपाल विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष शेखर कुलकर्णी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, आबा गर्दे, प्रमोद काटे, जिभाऊ पाटील यांच्यासह अप्पर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक उपस्थित होते.