कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही वर्षांत महावितरणची ग्राहकांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात अडकलेली आहे. ही थकबाकी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ७६ हजार कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. या थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक कणा मोडल्याचे चित्र दिसत आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. अनेक जण तारांवर आकोडे टाकून वीजचोरी करीत आहेत.
अशा वीजचोरांवर महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागातील अभियंते व कर्मचारी, अधिकारी यांनी कारवाई सुरू केली आहे. वीजचोरांवर धडक कारवाई करण्यासाठी व थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी कंबर कसली आहे. वीजचोरी शोधमोहीम हातात घेऊन साक्री उपविभाग अंतर्गत येणाऱ्या निजामपूर, छडवेल कोरडे, दहिवेल आदी भागांतील जवळपास २५ ते ३० वीजचोरी करीत असलेल्या ग्राहकांवर कारवाई करून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ही कारवाई गेल्या दोन दिवसांत करण्यात आली.
नोटीस बजावली
ज्यांच्याकडे वीजचोरी आढळून आलेली आहे, अशा ग्राहकांना महावितरण कंपनीकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या ग्राहकांकडून एकत्रितरीत्या सुमारे १० लाखांचा दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती साक्री महावितरण कार्यालयातील किरण नांद्रे यांनी दिली.
तसेच महावितरणने याआधीच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे वीजपुरवठा यांच्याकडेही वीजबिल वसुलीची कारवाई सुरू केली आहे, यात बऱ्याच ग्रामपंचायतींनी थोडी थकबाकी भरून उर्वरित बिल मुदतीवर भरण्याच्या विनंतीवर वीज तोडणीची कारवाई लांबवली आहे. ज्या ग्रामपंचायतींनी विनंती करूनही वीजबिल भरले नाही अशा सर्व ग्राम पंचायतींची वीज जोडणी खंडित केलेली आहे.
नियमित बिल भरणाऱ्यांना दिलासा द्यावा
आता सर्वच ठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बहुतांश ग्राहक नियमितपणे वीज बिल भरत असतात. परंतु काही ग्राहक तारांवर आकोडे टाकून वीजचोरी करीत असतात. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महावितरण युनिट दरात भरमसाटपणे वाढ करीत असते. त्यामुळे अशा वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरण कंपनीने सातत्याने कारवाई करून नियमित वीज भरणाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
महावितरणची आर्थिक स्थिती खालावली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरणा करून सहकार्य करावे. वीजचोरी, वीजहानी टाळून अधिकृत वीज जोडणी घ्यावी. वीजचोरांवर यापुढेही कार्यवाही केली जाईल.
- डी.डी. भामरे,
कार्यकारी अभियंता,
ग्रामीण विभाग, धुळे