जैताणे : तिळ्या कन्यांना जन्म देणाऱ्या मातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. चौघा कन्यांचे मातृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.येथील सावता चौकातील छोटु काशिराम खलाणे यांच्या पत्नी मनिषा खलाणे यांनी ३० रोजी धुळे जिल्हा रुग्णालयात तीन मुलींना जन्म दिला. तीनही नवजात मुलींची प्रकृती व्यवस्थित आहे. मात्र, तिळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर मनिषा यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना ४ रोजी या मातेची प्राणज्योत मालवली. मनिषा यांना या अगोदर एक मुलगी आहे. ती आता ३ वर्षांची आहे. त्यांचे पती अल्पभूधारक शेतकरी असून रोजंदारीने मोलमजुरीचे कामे करून उदरनिर्वाह करतात. आता पत्नी निधनाचे दु:ख पेलवत चार मातृछत्र हरपलेल्या कन्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या मुलींचा तुटपुंज्या परिस्थितीत कसा सांभाळ करावा, या विवंचनेत ते आहेत.समाजातील दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठान, प्रशासनाने आर्थिक मदतीचा हातभार लावावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
तिळ्या कन्या जन्मानंतर मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:56 IST