गतीमंद प्रज्वलला मिळाला ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 10:15 PM2020-02-16T22:15:02+5:302020-02-16T22:15:25+5:30

बालकल्याण समिती । अमरावतीतून होता हरवला

Moby Prajwal gets 'Aadhaar' | गतीमंद प्रज्वलला मिळाला ‘आधार’

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अमरावती येथील तेरा वर्षांचा गतीमंद मुलगा प्रज्वल हा दोन वर्षांपासून हरवला होता़ सायकल चालवत तो अमरावती रेल्वे स्टेशन वर आला़ त्याला रेल्वेचा मोह झाल्याने तो सहजपणे रेल्वेत बसला आणि थेट भुसावळला येउन पोहचला. २२ जुन २०१८ रोजी भुसावळ पोलिसांनी त्याला जळगाव बालकल्याण समितीकडे सोपविले़ त्यानंतर पुनर्वसनासाठी त्याला धुळे बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले़ धुळे बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ अमित दुसाणे, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड या सदस्यांनी त्याची काळजी आणि संरक्षणाची गरज पाहून शिरपूर येथील एन. झेड. मराठे गतीमंद बालगृहात त्याचा प्रवेश केला़
दरम्यान, बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बालगृहातील सहा मुलांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. सुदैवाने प्रज्वलचे आधीच आधार कार्ड काढलेले होते़ त्यामुळे त्याच्या बोटांचे ठसे अपलोड करताच त्याचा आधार डाटा समोर आला आणि त्याचे नाव व पत्ता समितीच्या हाती लागला़ पालकांचा शोध घेणे सोपे झाले़ आधार कार्ड मुळे प्रज्वल अनिल तंतरपाळे या मुलाच्या पालकांपर्यंत पोहचण्यात बालकल्याण समितीला आणि शिरपूर येथील एन. झेड.मराठे मतीमंद मुलांचे बालगृहाला यश आले़ पालकांशी संपर्क करुन प्रज्वल सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली़ प्रज्वलची आई मंगला, वडील अनिल तंतरपाळे या दोघांना मुलाला कधी भेटु, कधी पाहु याची प्रचंड उत्सुकता लागली़ त्यांनी त्याच दिवशी शिरपूर गाठले़ मुलाची भेट झाली तेव्हा त्यांच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला़ बालकल्याण समिती आणि शिरपूर बालगृहातील टीमचे आभार मानायला त्यांना शब्द सापडेना़ तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मुलाची भेट झाल्याने दोघांचे मन निशब्द झाले होते. हर्ष ओसंडून वाहत होता. मुलाची आणि आईवडीलांच्या मोठ्या विरहानंतर भेटीचा तो भावनीक क्षण पाहताना साऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले़ बालकल्याण समितीने कागदपत्रांचे सोपस्कार त्वरीत पूर्ण करुन प्रज्वलला त्याच्या आईवडीलांच्या स्वाधीन केले़ यावेळी अ‍ॅड़ अमित दुसाणे, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते पि. यु. पाटील, बालगृहाचे सचिव सुनिल मराठे, भगवान तलवारे, अधिक्षक प्रदिप पाटील, परेश पाटील उपस्थित होते़
समितीचे आवाहन
पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड आवर्जुन काढावे़ कारण मुलगा हरवल्यास त्याच्या बोटाच्या ठशांवरुन आधार डाटा मिळवून पालकांशी संपर्क साधता येतो़ तसेच मुलगा किंवा मुलगी हरवली असेल तर राज्यातील बालगृहांमध्ये शोध घ्यावा़

Web Title: Moby Prajwal gets 'Aadhaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे