कल्याणकारी निधी सुधारित नियमान्वये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी, खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, तसेच देश व राज्याची पूर, जळित, दरोडा, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी बजावणारे तसेच प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेत ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारानुसार महाराष्ट्रातून दहावीत उत्तीर्ण होणारे गुणानुक्रमे ५० पाल्य व बारावी उत्तीर्ण होणारे गुणानुक्रमे ५० पाल्यांना एक रकमी १० हजार रुपये लाभ दिला जातो.
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन विद्यापीठामध्ये सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, माजी सैनिक, पत्नी पाल्यांना एकरकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे यांच्याकडे १० ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.