सोनगीर येथे दर गुरुवारी आठवडी बाजार असतो. आठवडी बाजारात सर्वच वस्तू मुबलक प्रमाणात मिळतात. या आठवडी बाजारासाठी परिसरातील ग्रामस्थ खरेदी-विक्रीसाठी येतात. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यने सलग दुसऱ्या वर्षीही आठवडी बाजार काही कालावधीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
ग्रामीण भागात आठवडी बाजारात होणाऱ्या आर्थिक उलाढालीवरच अनेकांची उपजीविका अवलंबून असते. शेतकऱ्यांसाठी आपला भाजीपाला विकण्याचा आठवडी बाजार हा सोपा पर्याय आहे, तसेच इतर किरकोळ विक्रेत्यांसाठी आठवडी बाजार महत्त्वपूर्ण आहे. मात्र, कोरोनामुळे आठवडी बाजार भरण्यास मनाई केल्याने नेहमी गजबजणारा व आर्थिक चक्र चालवीत असलेला आठवडी बाजार बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट असतो. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजार भरायला सुरुवात होत असतानाच पुन्हा बाजार बंद झाले आहेत. यामुळे आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.