लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बहुचर्चित असलेल्या मनमाड - धुळे - इंदूर रेल्वे मार्गासंदर्भात धुळ्याचे खासदार हे बनवाबनवी करीत आहेत़ जनतेला फसविण्यापेक्षा सांगून टाका की रेल्वे मार्ग जमत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत तोंडसूख घेतले़ दरम्यान, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडावी या विषयावर त्यांनी सम्मती दर्शविली़मनमाड - धुळे - इंदूर रेल्वे मार्गासंदर्भात माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भूमिका विषद केली़ रेल्वे मार्गाचे काम जेएनपीटी नव्हेतर रेल्वे बोर्डाचे कॉर्पोरेशन करणार आहे़ त्यांच्या अजेंड्यावर हा मार्गच नाही़ त्यामुळे रेल्वे मार्ग होईल की नाही, हा संभ्रम कायम आहे़ मालेगाव तालुक्यातील झोडगे आणि धुळे तालुक्यातील कापडणे या दोन गावांचा उल्लेख भूमि अधिग्रहणाबाबत करण्यात आला़ त्याबाबत मी विचारणा केली असता ग्रामपंचायत, तलाठी यांच्याकडून तसे काहीही झालेले नाही असे सांगण्यात आले़ भूमि अधिग्रहण अथवा आखणी बाबतची माहिती प्रथम महसूल विभागाला दिली जाते़ यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या तलाठीपासून ते तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जावून सत्यता तपासावी असेही त्यांनी सांगितले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले त्या बोरविहिर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात केवळ १० हजार रुपयांची तरतूद केली आहे़ रेल्वे मार्गाच्या हाताळणीसाठी आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी अभ्यासाची गरज असते, तो त्यांचा नाही़ खासदारांनी सांगून टाकावे की जमत नाही़ अजूनही वेळ गेलेली नाही़ बाकीचे बघतील, रेल्वे मार्गाचे करायचे काय? बाकीच्यात तुम्ही असणार का, असे विचारल्यावर गोटेंनी नकार दर्शविला़
मनमाड-इंदूर रेल्वे प्रश्नासंदर्भात खासदाराकडून होतेय बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:26 IST