हे पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार असून कोणीही कोल्हापुरी बंधारे अथवा शेतात वळवू नये, यासाठी सिंचन विभागाने पथक तयार करून पाण्याची चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसेच पाणी चोरी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करावी, पोलिसांनी यासाठी सहकार्य करावे, असे आदेशात म्हटले आहे. हे पाणी उजव्या कालव्यातून जाणार असल्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढून विहिरींचा जलस्रोतदेखील वाढणार असून यामुळे येथील शेतकऱ्यांचा बागायती कापूस लागवडीसाठी संधी असल्याने अप्रत्यक्षपणे हा तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पाची पाणी पातळी कमी होईल
उजव्या कालव्यातून हे पाणी सोडले जाणार असून कालवा नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची भीती मालपूरकरांनी व्यक्त केली आहे. असा प्रयोग भरपावसाळ्यात ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यातून विखरण तलाव भरण्यासाठी केला गेला. या कालव्यातून पाणी सोडले होते. मात्र ठीक ठिकाणी प्रचंड गळतीमुळे विखरण तलावात पाणी पोहोचलेच नाही. यामुळे आहे तेही पाणी संपवून जिल्हाधिकारी काय साध्य करणार आहेत? यासाठी प्रथम कालव्याची दुरुस्ती महत्त्वाची असून एक्स्प्रेस कालवा झाला तरच पाणी विखरण तलावात पोहोचेल. यासाठी मालपूर ग्रामपंचायतीने पाणी सोडण्यास विरोध दर्शविला असून तसे पत्रच जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाला दिल्याचे येथील लोकनियुक्त सरपंच मच्छींद्र शिंदे यांनी सांगितले.