धुळे : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही, तर सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर काही पॅसेंजर सुरू झालेल्या आहेत. त्यातच आता या पॅसेंजर गाड्यांचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून धुळे-चाळीसगाव पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही, तर सुरत-भुसावळ मार्गावर दोन पॅसेंजर सुरू असून, एक पॅसेंजर अद्यापही सुरू झालेली नाही. गोरगरीब प्रवाशांना प्रवासासाठी पॅसेंजरच सोयीची ठरत असते. मात्र आता हीच पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित झाली तर ती गाडी लहान स्थानकावर थांबणार नाही. तसेच पॅसेंजरची एक्स्प्रेस झाली की भाडेही वाढणार. दरम्यान, जिल्ह्यातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांबाबत अद्याप निर्णय नसला तरी या गाड्यांबाबत काय होणार, असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर
गाडी क्रमांकनाव सध्या सुरू की बंद
५१११२ धुळे-चाळीसगावबंद
५९०७५ सुरत-भुसावळसुरू
५९०७७ सुरत-भुसावळसुरू
तोट्याची कारणे काय?
सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर अनेक लहान स्थानके आहेत, या पॅसेंजरने फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर मोठी स्थानके सोडली तर लहान स्थानकांवर कोणीही फलाट तिकीट काढत नाही.
काही स्थानके अशी आहेत की, त्या स्थानकावरून केवळ-एक-दोन प्रवासी चढतात आणि उतरतात. त्यामुळे पॅसेंजरला केवळ थांबा असतो. रात्रीच्यावेळी धावणाऱ्या पॅसेंजरसाठी लहान स्थानकावर प्रवासीही उपलब्ध नसतात. एक्स्प्रेस सुरू झाल्यास, त्यातून रेल्वेला दुप्पट भाडे मिळू शकेल असा विचार आहे.
सर्वसामान्यांना एक्स्प्रेस
कशी परवडणार?
ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी पॅसेंजर गाडीच सोयीची असते. मात्र हीच पॅसेंजर जर एक्स्प्रेस झाली तर प्रवास कसा करायचा असा प्रश्न आहे. शिवाय ती एक्स्प्रेस लहान स्थानकावर थांबणार नाही.
रणजित पाटील, प्रवासी
केंद्र शासनाने पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा आहे. हा सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागेल.
बी.आर. चौधरी, प्रवासी