सध्या मालपूरसह परिसरात ई-पीक पाहणीच्या नावाखाली गोरख धंदा सुरू झाला आहे. कोणीही यावे व येथील शेतकऱ्यांना नाडावे असे चालले असून यासंदर्भात महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. येथील महात्मा फुले सभागृहात या विषयावर स्वतंत्र मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यानंतर महसूल विभागाच्या यासाठी कुठल्याही उपाययोजना दिसून आल्या नाहीत. याउलट अक्षांश रेखांश व्यवस्थित आपल्याकडून येणार नाही. परिणामी आपली पीक पाहणीची नोंद होणार नाही. यामुळे आगामी नुकसानभरपाई झाली तर त्या लाभापासून आपण वंचित राहू या भीतीपोटी येथील शेतकरी शंभर देऊन पीक पाहणीची नोंद करून घेताना दिसून येत आहेत तर महसूल विभागाने मार्गदर्शन शिबिर घेऊन आपली जबाबदारी संपली असल्याने शेतकऱ्यांचे ते काम असल्याचे सांगून अंगावरील घोंगडे झटकत असल्याचे दिसून येत असल्यामुळे शेवटी कुठेका असेना नाडला जातो तो बळीराजाच. यामुळे महसूल विभागाने याची दखल घेऊन हा गोरखधंदा त्वरित थांबवावा.
मौजे मालपूर शिवारात एकूण १ हजार २९६ खातेदार आहेत. यात पावसाअभावी मूग, उडीद, आदी कडधान्य पीक पाहणी लावण्याआधीच शेतशिवारात नाहिसे झालेले दिसून येत आहे. यात भुसारमधील बाजरी, ज्वारीचे पिकाची दुबार पेरणी झालेली असून त्या दरम्यान पाऊस लांबला व हवेचा जोर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहात होता, म्हणून एकाच मुळावर तग धरून उभी असलेली बाजरी हवेतच उडून गेलेली आहे तर ज्वारीला अळ्यांनी भस्मसात केले आहे म्हणून आपल्या काही ना काही मदत जरुर भेटेल या आशेवर येथील शेतकरी असून पीक पाहणीची नोंद सातबारावर करण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. यात बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्राईड मोबाइलची सुविधा नाही तर काहींकडे साधा मोबाइल देखील नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे यासाठी महसूल विभागाने दखल घेऊन अशा शेतकऱ्यांना आधार द्यावा व होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.
प्रतिक्रिया...
काही जण शंभर रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. याची कल्पना वरिष्ठांनादेखील देण्यात आली असून तक्रार आल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या कामासाठी कोणाचीही अधिकृत नेमणूक केली नाही. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.
विशाल गारे
तलाठी, मौजे मालपूर
फोटो :- मालपूर येथील ई-पीक पाहणी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना अप्पर तहसीलदार सुदाम महाजन.
040921\20210817_121523.jpg
मालपूर येथील ई पीक पाहणी मार्गदर्शन शिबीरात मार्गदर्शन करताना अप्पर तहसीलदार सुदाम महाजन.