धुळे : ‘कोविड- १९’ च्या प्रादुर्भावामुळे जंगलांचे महत्त्व सर्वांना कळले आहे. त्यामुळे लळिंग कुरणाचे संवर्धन आणि विकासासाठी प्रयत्न करून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच धुळे शहर व परिसरात वेगवेगळ्या २० ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
धुळे वनविभाग, धुळे आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंगतर्फे निसर्ग पर्यटन क्षेत्रात ट्रॅकिंग आणि वृक्ष लावगड कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी लांडोर बंगला येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार हे अध्यक्षस्थानी होते. उपवनसंरक्षक एम. एस. भोसले, सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, अमितराज जाधव (शिरपूर), वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील लळिंग संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाळके यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी लांडोर बंगला, लळिंग कुरणातील धबधबा, कॅक्टस गार्डनची पाहणी केली.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, प्रत्येकाला निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडते. लळिंग कुरणात ट्रॅकिंग उपक्रम सुरू होत आहे. ही कौतुकाची बाब आहे. लळिंग कुरणात विविध जैवविविधता आहे. तसेच वन्य पशु-पक्ष्यांचाही संचार आहे. यामुळे नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद मिळेल. लळिंगसह धुळे जिल्ह्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करून वनोद्यानांना चालना द्यावी. नागरिकांनी नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले.
मुख्य वनसंरक्षक श्री. पगार यांनी सांगितले, जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरीच्या धर्तीवर लळिंग कुरण, फॉडर बँक परिसराच्या विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावा. त्यासाठी इको टुरिझम मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे पर्यटन विकास होऊन लळिंगसह परिसरातील गावातील तरुणांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होईल.
उपवनसंरक्षक भोसले म्हणाले, धुळे वनविभागाचे एकूण वनक्षेत्र १.९२ लाख हेक्टर आहे. धुळे वनविभागातर्फे वनक्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात २५ स्थळांवर ६६० हेक्टर क्षेत्रात ११ लाख ५९ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात येईल. त्यात प्रामुख्याने डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात येईल. लळिंग कुरणालगतच लळिंगचा ऐतिहासिक किल्ला आहे. यामुळे वनपर्यटनाला चालना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सहाय्यक वनसंरक्षक श्री. पाटील यांनी आभार मानले.
ट्रेकिंग उपक्रमाचे उद्घाटन
तत्पूर्वी जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते लळिंग निसर्ग पर्यटन क्षेत्रातील ट्रेकिंग उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक पगार, उपवनसंरक्षक भोसले, सहाय्यक वनसंरक्षक पाटील, सामाजिक कार्यकर्ते ॲड. पंकज गोऱ्हे यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकूण ९.८ किलोमीटर हा ट्रॅक असून तो लळिंग कुरणातून जाणार आहे.