लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पाणी पुरवठा अभियंत्यांमुळे धुळेकरांच्या घशाला कोरड पडली आहे़ नियोजनशुन्य कारभारामुळे धुळेकर पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप महापौर चंद्रकांत सोनार यांनी बैठकीत केला़ पाणी वितरणात नियोजनाचा अभाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी पाणी प्रश्नावर आपल्या दालनात तातडीची बैठक बोलाविली़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, विरोधी पक्षनेते साबीर शेख, आयुक्त सुधाकर देशमुख, महिला सभापती निशा पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, अभियंता कैलास शिंदे, नगरसेवक नागसेन बोरसे, सुनील बैसाणे, संतोष खताळ, नगरसेविका भारती माळी आदींची उपस्थित होती़ शहरातील काही भागात ४ ते ५ दिवसाआड तर कुठे ८ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे़ धुळेकर नागरीकांना किमान ३ दिवसाआड पाणी मिळायला हवे, असे नियोजन नागरीकांना अपेक्षित आहे़ मात्र, तसे होताना काही दिसत नाही़ उलट सोईनुसार पाणी वितरीत केले जाते़ नागरीकांकडून विचारणा झाल्यास पाईपलाईनचे काम सुरु असल्याचे ठोकळेबाज उत्तर देवून हात वरती करण्याचा प्रयत्न होतो़ पाणी सोडण्याची एक निश्चित वेळ आणि आठ दिवसाआड पाणीपुरवठा ऐवजी ३ ते ४ दिवसाआड नागरीकांना पिण्याचे पाणी मिळाल्यास व्यक्त होणारी नाराजी काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे़ मात्र, तसे काही होताना दिसत नाही़ पाणी सोडण्याची वेळ पाळली जात नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे़ महापालिकेत सध्या भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे़ एकहाती असल्यामुळे कोणत्याही कामांचे व्यवस्थित नियोजन आणि त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे़ मात्र, पाणी वितरणाचे नियोजन नसल्यामुळे तातडीची बैठक घेण्याची वेळ आल्याचे दिसून आले़ हद्दवाढ झाल्यामुळे त्या गावांकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या़ अवैध नळधारकांवर गुन्हे नोंदवा : आयुक्तमहापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख पाणी प्रश्नाच्या बैठकीत पाणीपुरवठ्याच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांवर चांगलेच बरसले़ कामात कुचराई केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल़ पाणी वितरणाचे बिघडलेले वेळापत्रक ताबडतोब दुरुस्त करा़ अवैध नळ कनेक्शन धारकांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्यात यावे़ यात मी असो वा महापौर किंवा कोणीही असल्यास कोणालाच सूट देता कामा नये़ कोणावरही दया-माया दाखविता कामा नये़ असा सक्त सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या़ बंद खोलीत गुफ्त गू़महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात मोजक्याच पदाधिकाºयांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली़ सुरुवातीला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बसण्यास मुभा होती़ मात्र, पाणी वितरणाबाबतचा गलथानपणा चव्हाट्यावर येताच माध्यम प्रतिनिधींना आयुक्तांकडून बैठकीस बसण्यास मज्जाव करण्यात आला़
पाणीप्रश्नी धुळे महापालिकेत काथ्याकूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:27 IST