काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:58+5:302021-03-01T04:41:58+5:30

धुळे : काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा, असे प्रतिपादन ‘सेनं सायी वेस’ कविता संग्रहाचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ...

The journey of poetry should be from self to group - Rathod | काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा - राठोड

काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा - राठोड

Next

धुळे : काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा, असे प्रतिपादन ‘सेनं सायी वेस’ कविता संग्रहाचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी डॉ. वी. रा. राठोड यांनी केले.

जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालयात ‘अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती’ आणि ‘साहित्य सृजन मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ‘युवा लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. राठोड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कविता संग्रहाचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उपप्राचार्य डॉ. विद्या पाटील, प्रा. व्ही. एस. पवार, डॉ. डी. के. पाटील, डॉ. वर्षा पाटील, माजी उपप्राचार्या डॉ. शशिकला पवार, प्रा. उषा पाटील आदी उपस्थित होते.

कवी डॉ. राठोड म्हणाले की, काव्यनिर्मिती, काव्यप्रकृती, त्यामागील भूमिका प्रत्येकाची भिन्न स्वरूपाची असते. केवळ व्यक्त होण्यासाठी नाही तर ज्यांचा कोंडमारा होत आहे, अशा अभावग्रस्तांचा आवाज म्हणजे कविता आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक सत्य हे लेखणीतून व्यक्त झाले पाहिजे. समाज उत्थानासाठी सामाजिक जबाबदारीचे भान लेखक-कवींना बाळगावे लागणार आहे. समाजाच्या विकासासाठी मातृभाषेतून काय योगदान देता येईल, याचा विचार व्हायला हवा.

कवी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कविता लेखन हा अनुभव, विचार, भावसंवेदनांचा मुक्त मार्ग आहे. समाजाशी, समूहाशी संबंधित लेखन येण्यासाठी प्रांतिक भाषांचा मोठ्या प्रमाणात वापर करायला हवा. ज्यातून सकस भाषा समृद्धीचे कार्य होईल. वेगवेगळ्या प्रवाहातील लोकांनी प्रांतिक भाषांचा वापर करून लेखन केल्यास वास्तविक समाज चित्रणाबरोबर शब्दवैभव, भाषावैभव वाढण्यास मदत होईल.

प्राचार्य डॉ. पी. एच. पवार म्हणाले, जीवन जगताना मातृभाषेला मोठे महत्त्व आहे. मातृभाषेमुळेच आपण समाजजीवनाशी जवळीक साधू शकतो. मातृभाषा जगण्याचा आधार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. योगिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी केले तर प्रा. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.

Web Title: The journey of poetry should be from self to group - Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.