धुळे - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. लस घेतल्यानंतर काही जणांना ताप येतो तर काहींना ताप येत नसल्याने लसीबाबत चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणतेही गैरसमज बाळगू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारो डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काही जणांना ताप, थंडी वाजून येणे, अंगदुखी, डोकेदुखी अशाप्रकारचा त्रास होतो आहे. तर काही जणांना कोणताच त्रास होत नाही. त्यामुळे मी लस घेतली तरी कोणताच त्रास झाला नाही असे प्रश्न काहींना पडत आहेत. मात्र त्रास झाला नाही तरी लस परिणामकारकच असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
कोविशील्डचा त्रास अधिक
जिल्ह्यात सध्या कॊव्हॅक्सिन व कोविशील्ड या दोन्ही लसी टोचल्या जात आहेत. लस घेतलेल्या काही जणांना कोणताही त्रास होत नाही. कोविशील्ड हि लस घेतलेल्या नागरिकांना अधिक त्रास होत असल्याचे समोर आले आहे.
लसीनंतर काहीच झाले नाही
कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र कोणताही त्रास झाला नाही. पहिल्या डोसवेळी त्रास झाला नाही तेव्हा दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास होईल असे वाटले होते. त्रास झाला तरच लस सुरक्षित आहे असे काही नाही. माझ्या मनात कोणताही गैरसमज नाही. नागरिकांनीही गैरसमज बाळगू नये.
- निलेश चौधरी
कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. आता दुसरा डोस घेऊन आठ दिवस झाले मात्र कोणताही त्रास झाला नाही. लस घेतल्यानंतर त्रास होईलच असे काही नाही. त्याबाबत मला पूर्णपणे माहिती होती. म्हणून काळजी वाटली नाही. लस सुरक्षित असल्याचे माहिती आहे.
- प्रशांत सोनवणे
त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही -
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर त्रास होईलच असे नाही. लस पूर्णपणे जीवनरक्षक व सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना नियमांचे पालन करावे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
पहिला डोस - ६१०९२२
दुसरा डोस - २१९४२९