शिंदखेडा : शहरात गेल्या तीन महिन्यात प्रथमच रूग्णाचा अहवाल मृत्यूनंतर र्पाझिटिव्ह आला. त्यानंतर गावात नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून दोन दिवसात १२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एक संदिग्ध रूग्ण आढळल्याने, त्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, प्रशासन प्रमुख प्रल्हाद देवरे यांनी दिली.शिंदखेडा शहरात १०४ दिवसात वार्ड क्रमांक मध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यात २२ नागरिकांना कॉरंटाइन करण्यात येऊन १२ जणांचे स्वॅब मंगळवारी घेण्यात आले. त्यांचा रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे. कोरोनाचा आजार शहरात इतरत्र जास्त प्रसार होऊ नये म्हणून तहसील, नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग कडून संपूर्ण शहरात घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी ४० कर्मचाऱ्यांच्या ८ पथकांकडून गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.आरोग्य विभागातील कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तपासणीचे काम करीत आहेत. आतापर्यंत १२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात तपासणीत कोरोनाचे लक्षणे असलेला संदिग्ध रुग्ण आढळून आला. त्याचे नमुने घेउन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. येत्या चार दिवसात संपूर्ण शहराची तपासणी पूर्ण होणार आहे. नगरिकांनी स्वत:हून तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून केले आहे. दोन दिवसात कंटेन्मेंट झोन वार्ड क्रमांक सात, सहा, तेराघर मोहल्ला, हॅण्डल चौकात तपासणी झाली.
१२ हजार नागरिकांची केली आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:56 IST