हर्षद गांधी ।निजामपूर : घरात टीव्ही नाही म्हणून ४-५ वर्षांचा मयूर कागदावर रेषांनी चित्रे रेखाटू लागला. सहज आकार निर्मिती करून विविध व्यक्ती, वस्तू व निसर्ग चित्र काढु लागला. अशातूनच जन्मला हा उदयोन्मुख बालचित्रकार मयूर गोकुळ पाटील.त्याच्या यशाची सुरुवात लोकमत बाल विकास मंचच्या चित्रकला परिक्षेपासून झाली. सहज सहभाग घेतला आणी ‘माझी शाळा’ या विषयाचे चित्र काढले. त्यात त्याचे कौतुक झाले. ५वीत असतांनाच त्याने प्रथम क्रमांकाचे त्याच्या आयुष्यातील पहिले ७०० रुपयाचे बक्षीस पटकावले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.तसेच कलेत रुची वाढली. घरातून आई वडिलांचीही मोलाची साथ मिळाली. त्यामुळे कलागुण निखरले. यानंतर तंबाखूमुक्त अभियानअंतर्गत स्पर्धेतसुध्दा प्रथम क्रमांक, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक, युवा चित्रकला स्पर्धेत अनेक बक्षिसे पटकावली. एव्हाना ६वी पर्यत बºयापैकी चित्रे काढणे जमल्यावर त्याने एलिमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षा ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण केली. शालेय अभ्यासक्रमासोबतच चित्रकलेच्या परिक्षेत स्पृहणीय यश संपादन केले.या उदयोन्मुख बाल चित्रकाराने रंगविलेल्या अनेक चित्रांकडे पाहून निश्चितच कोणीही विस्मयचकित होतो.मयूर गोकुळ पाटील हा बालचित्रकार सध्या इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. २०१८ च्या ‘मुख्यमंत्री चषक’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. ट्रॉफी आणि रोख रक्कम मिळाली. ‘बेटी बचाव’ चित्र स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.अशा अनेक स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने मयूरचा आत्मविश्वास वाढून कलेतील नैपुण्य विकास होत आहे. व्यक्तीचित्रे मयूर सफाईदारपणे सहज काढतो. त्याने काढलेल्या चित्रांना व्हॉट्सअॅप, फेसबूकवर चांगला प्रतिसाद मिळतो.धुळे आकाशवाणीवरही मयूरची खास मुलाखत प्रसारित झाली आहे. त्याला भारतीय चित्रकारांबरोबरच जगप्रसिध्द अनेक चित्रकारांची माहिती आहे. त्याने कमी वयातच काही पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्टे बनविली आहेत. त्याने काढलेली छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लालबहादूर शास्त्री, स्वामी विवेकानंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी या चित्रांना पाहून बालवयातच त्याची विकसित झालेली कला आश्चर्यात टाकते.आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे पेन्सिल चित्र त्यांनी स्वत: पाहून मयूरची पाठ थोपटली. मयूरला नाटकात काम करण्याची खूप आवड आहे. त्याने औरंगजेब, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, इंद्रदेव यांच्या भुमिका चांगल्या प्रकारे साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली. त्याने अनेक प्रबोधनात्मक नाटकांमध्ये प्रभावी भुमिका वठविल्या आहेत.जागतिक दजार्चा चित्रकार बनण्याची त्याची इच्छा आहे. मयूर हा निजामपूरचा रहिवासी असून त्याचे वडील गोकुळ त्र्यंबक पाटील हे निकुंभे येथे प्राथमिक शिक्षक आहेत. तो सध्या धुळे येथील झेड.बी. पाटील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
शालेय जीवनातच गाठली चित्रकलेत उंची व अभिनयात चमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:36 IST