तरुणांना वेड लावणार गुटख्याची नशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:13+5:302021-05-16T04:35:13+5:30

जिल्ह्यात केवळ दोन दिवसात पावणेदोन कोटींचा गुटखा पकडण्यात आला. अशापद्धतीने दररोज किती कोटींचा गुटखा धुळे शहरात येत असेल ...

Gutkha addiction will drive young people crazy | तरुणांना वेड लावणार गुटख्याची नशा

तरुणांना वेड लावणार गुटख्याची नशा

Next

जिल्ह्यात केवळ दोन दिवसात पावणेदोन कोटींचा गुटखा पकडण्यात आला. अशापद्धतीने दररोज किती कोटींचा गुटखा धुळे शहरात येत असेल आणि राज्यातील अन्य शहरात जात असेल, याचा नुसता हिशेब लावण्याचा प्रयत्न केला तर डोके चक्रावून टाकेल, एवढा मोठा आकडा समोर येतो. पाच आणि दहा रुपयात मिळणाऱ्या गुटख्याच्या पुडीतून हा धंदा करणाऱ्या डाॅनला मिळणारी ‘कमाई’ कोट्यवधीत आहे. लहान पानटपरी, चहाचे दुकान, गोळ्या बिस्कीट विकणाऱ्या लोकांकडे मिळणाऱ्या गुटख्याच्या धंद्यातील ‘छुपी कमाई’ ही डोळे विस्फारुन टाकणारी आहे. या कमाईचा हिस्सा प्रत्येकाला मिळत असल्याने हा धंदा बिनबोभाट सुरू आहे. या धंद्याकडे सहसा काेणाचे लक्षही जात नाही. त्यामुळेच ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ या पद्धतीने सुरू आहे.

सर्रासपणे विक्री - जिल्ह्यातील प्रत्येक गाव, लहानशा पाड्यात अन्य कुठलीही वस्तू मिळो वा ना मिळो पण गुटख्याची पुडी, तंबाखूची पुडी नक्की मिळेल. कारण प्रत्येक गावात आणि पाड्यात पुड्या आणि तंबाखू खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुड्या खाणाऱ्यांमध्ये दहावीच्या मुलांपासून ८० वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वच शौकीन दिसतात. पोटाला काही खाणार नाही, मात्र तोंडात तंबाखू जरुर लागते. दिवसातून पाच रुपयांची गुटख्याची दहा - दहा पुडी खाणारे बहाद्दर आहेत.

खाण्याची वेगवेगळी तऱ्हा - गुटख्याची पुडी खाण्याची प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा असते. काही तरुण ही पुडी फोडतात आणि पूर्ण तोंडात टाकतात. काही हातात घेऊन त्यातील पावडर बाजूला करून मग ती तोंडात टाकतात. तर तंबाखू खाण्याची पद्धत ही मात्र ठरलेली चुना टाकून चोळून मग ती ओठात दाबून धरायची.

गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले - तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येपेक्षा गुटखा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शाळेतील आठवी, नववी, दहावीची मुलेसुद्धा गुटखा खातांना दिसतात. शाळेबाहेर गोळ्या बिस्कीट विकणाऱ्या गाडीवरसुद्धा गुटखा सहज उपब्लध होतो. मधल्या सुटीत मुले गुटखा खातांना आढळून येतात.

जादा किमतीला विक्री - बंदीच्या नावाखाली गुटखा जादा किमतीला विकला जातो. जिल्ह्यात १० रुपयांची गुटख्याची पुडी जास्त चालते. १० रुपये किमतीची पुडी १६ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत विकली जाते. गुटख्याची २० पुडी एका मोठ्या पुड्यात येतात. म्हणजे दिवसभरातून दोन पुडेही विकले तर किमान दीडशे ते दोनशे रुपयांचा फायदा मिळत असल्याने सर्वच लहान व्यापारी या पुड्याची विक्री करता. हा पुड्या खाण्याचे शौकीन शासकीय कर्मचारी, पोलिसांमध्येही बरेच असतात. ‘चौकीदार ही खरेदीदार’ झाल्यावर कोणाची भीती काय बाळगायची अशा पद्धतीने शहरात सर्वच ठिकाणी सर्रासपणे गुटख्याची विक्री होतांना दिसते.

मोठे रॅकेट कार्यरत- धुळ्यातून राज्यभरात गुटखा पाेहचविला जातो. हा गुटखा अहमदाबाद येथून निझर येथे येतो आणि तेथून मग तो धुळ्यात येतो. याशिवाय मध्य प्रदेशच्या इंदूर येथूनही हा गुटखा धुळ्यात आणि पुणे, मुंबई पर्यंत जातो. मध्य प्रदेशातून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसेसमधूनही याचे पार्सल येत असते. हे पोलिसांकडून वारंवार झालेल्या कारवाईतून स्पष्ट होते. गुटख्याचा धंदा करणारे रॅकेट कार्यरत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून प्रत्येकाला हिस्सा मिळत असल्याने ते सुरळीतपणे सुरू असते. पण काही वेळेस जर यासंदर्भात जास्त चर्चा झाली. तर मग कोटा पद्धतीने रेड टाकली जाते. किंवा जर या रॅकेटमधील एखाद्याला जर आपला हिस्सा मिळाला नाही किंवा हिस्सा वाढविण्यावरुन वाद झाला की मग कारवाई केली जाते. नंतर ‘सेटलमेंट’ झाले की मग पुन्हा सर्व ‘जैसे थे’ होते आणि धंदा तेजीत सुरू होतो. त्यामुळेच या कारवाईत सातत्य दिसून येत नाही.

नशेसाठी जीव कासावीस- गुटख्याचा नशा ही खूप वेडी नशा असते, असे म्हटले जाते. पुडी जर मिळाली नाहीतर ती मिळविण्यासाठी तो व्यक्ती कुठलीही किंमत मोजायला तयार असतो. त्याचा फायदा मग हे व्यापारी उचलतात आणि गुटख्याची पुडी अव्वाच्या सव्वा भावात विकतात. ही नशा आता शाळकरी मुलांपर्यंतही पोहचली आहे. त्यातून कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होतात. म्हणून हा धंदा पूर्णपणे बंद झाला पाहिजे, असे ज्यांनी आपल्या परिवारातील व्यक्ती गमाविले आहे, अशा लोकांना मनापासून वाटते. यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे, अशी रास्त अपेक्षा आहे.

Web Title: Gutkha addiction will drive young people crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.