प्रजासत्ताकाचा ७१ वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ, क्रीडा पुरस्कार वितरण, गुणवंतांचा सत्कार आणि कोरोना विषाणूच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री सत्तार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
पालकमंत्री सत्तार म्हणाले, ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज वितरणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २६ हजार १५ शेतकऱ्यांना १२४ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.’
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५२ हजार ७५२ शेतकऱ्यांना ४४९ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांतील कर्ज वितरणातील हा उच्चांक आहे.
जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी, पूर, गारपीटमुळे नुकसान झालेल्या २१ हजार ८०० शेतकऱ्यांना १० कोटी ४९ लाखांची मदत करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या १७ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणे चौकशी करून मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली. आतापर्यंत १ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. रब्बी हंगाम २०२० करिता जिल्ह्यातील तीन हजार ९६६ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. खरीप हंगाम २०२० करिता ५९ हजार ३२१ शेतकऱ्यांनी ४९ हजार ६८३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२०- २०२१ करिता १९० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश सर्वच शासकीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यात १२ हजार ७७ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते विहीत कालावधीत पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ६८ हजार १३८ गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. तसेच माहे एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत गहू, तांदूळ, साखर, डाळ, भरडधान्य असे मिळून १ लाख ३० हजार ३६६ टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलाला तीन ड्रोन आपण उपलब्ध करून दिले आहेत.
गुणवंतांचा गौरव
यावेळी पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी संजय यादव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (ध्वजनिधी संकलनात १०० टक्के इष्टांक पूर्ण) यांचा सत्कार करण्यात आला, तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी हर्षिता प्रवीण राठोड, संकेत हेमकांत कोठावदे, प्रणव प्रदीप भदाणे (सर्व जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे), पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उत्तीर्ण अभिनव प्रमोद बागूल (जयहिंद हायस्कूल, धुळे), तनिषा सचिन ढोले (केंद्रीय विद्यालय, धुळे), मोक्षदा संदीप राऊळ (चावरा स्कूल), पार्थ किसन फणसे (सिस्टेल स्कूल), पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील श्रुती हेमंत बाविस्कर (जयहिंद हायस्कूल), जतिन राहुल पाटील (चावरा स्कूल), अनुराग किशोर पाटील (अमरिशभाई आर. पटेल स्कूल), जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते अविनाश वालचंद वाघ (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक), ललित किशोरसिंग गिरासे (गुणवंत खेळाडू), मुस्कान सुरिंदर कटारिया (गुणवंत खेळाडू), पोलीस पाटील शिवाजी चिंधा पाटील (साळवे, ता. शिंदखेडा), महेंद्र विजय पाटील (तावखेडा, ता. शिंदखेडा), संदेश रोहिदास पाटील (धनूर, ता. धुळे), श्रीकांत तुकाराम वाघ (रामी, ता. शिंदखेडा), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते ज्योत्स्ना जगदीश देठे (प्रथम), स्मितल सुरेश देवरे (द्वितीय), विनोद राजेंद्र पाटील (तृतीय), पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष पाटील, दिनेश विठ्ठलराव आहेर यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडील प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. याशिवाय कोरोना विषाणूच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कवी जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.
पालकमंत्री महोदयांच्या भाषणातील क्षणचित्रे
* जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २० हजार १९५ क्विंटल कापसाची खरेदी
* तूर्तास टंचाईसदृश परिस्थिती नाही
* २०२०- २०२१ या वर्षाकरिता ५४ लाख रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार, ७७ गावे ३३ वाड्यांसाठी ११० उपाययोजना प्रस्तावित.
* विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदीदारांची साखळी निर्माण करणार.
* या अभियानांतर्गत देशी कपाशी, रब्बी ज्वारी, हळद, लसूण, हरभरा, गहू आदी पिकांचा समावेश.
* जिल्ह्यात १४ हजार ३६७ वैयक्तिक वनहक्क दावे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविले.
* आतापर्यंत १४ हजार ३५६ वनपट्ट्यांचे वाटप