धुळे - व्यापारी विविध प्रकारचे कर देऊन शासनाला मदत करत असतात. व्यापारीसुद्धा समाजाचा घटक आहे त्यामुळे व्यापारी दुकानांचा विमा शासनाने काढावा, अशी मागणी बिझनेस अँड कॉमर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
व्यापारीसुध्दा समाजाचा घटक आहे. शासनाचा तर तो पाठीचा कणा आहे. शासनाने लावलेले विविध प्रकारचे कर नियमितपणे तो भरत असतो. एखाद्या वेळी थोडीशी चूक झाली किंवा उशीर झाला तर शासन व्याजासकट दंडाची वसुली करते. परंतू ज्या ज्या वेळी व्यापाऱ्यांवरती पूर व आगीसारख्या दुर्घटना ओढवतात त्यावेळी मात्र शासन कोणतेही अर्थसाहाय्य करत नाही. शासन मदत करणार नसेल तर व्यापारी केवळ कर भरण्यासाठीच आहे का, असा प्रश्न पत्रकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, शासन जर विविध प्रकारच्या कररूपात व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करत असेल तर संकटाच्या वेळी मदतही केली पाहिजे. चिपळूण येथील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने अद्याप त्यांना मदत केली नाही. यापुढे व्यापाऱ्यांच्या हितासाठी लढा उभारणार असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. पत्रकावर उपाध्यक्ष गोकूळ बधान, सचिव किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते यांच्या स्वाक्षरी आहेत.