शहरातील प्रभाग १३ मधील अन्सार नगर, आंबेडकर नगर, दिलदार नगर या भागात घाणीचे साम्राज्य परसले आहे. त्याचप्रमाणे मनपाच्या सार्वजनिक शाैचालयांची दुरवस्था झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही.
सोमवारी मुस्लिम ओबीसी-एसबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रभागातील महिला व पुरुषांसह लहान मुलांनी प्रभागातील कचरा नवीच दाखल झालेले अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात आणून ठेवला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कापडणीस यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रभाग १३ मधील स्वच्छता निरीक्षक साईनाथ हे अकार्यक्षम असून, कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यास योग्य नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला. तातडीने प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुस्लिम ओबीसी-एसबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष अश्यापक शेख, अकबर अन्सारी, जाकीर शेख, सलमा सैय्यद, जुलेखा अन्सारी, अरशद शाह, आदी उपस्थित होते.