धुळे : नाशिक येथील हिस्ट्री शिटर दरोडेखोरांच्या पाच जणांच्या एका टोळीला धुळ्यात दरोडा टाकण्यापुर्वीच साक्री रोडवर पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले़ ही घटना रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मलेरिया आॅफिस ते सुरेंद्र डेअरीदरम्यान घडली. संशयितांकडून पिस्तुल, जिवंत काडतूस आणि घातक शस्त्रांसह कार असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़साक्री रोड भागात एक कार संशयास्पदरित्या फिरत असून त्यात शस्त्र आहेत़ त्यातील संशयित कुठेतरी दरोडा टाकतील अशी शक्यता असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवरील पथकाला अलर्ट करीत स्वत: त्या दिशेने धाव घेतली़ रविवारी रात्री ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मलेरिया आॅफिसकडून साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळील सुरेंद्र डेअरीच्या दिशेने एमएच १५ ईई ०५३९ क्रमांकाची कार येत होती़ पोलिसांना पाहुन चालकाने कार जोरात नेली. त्यामुळे पोलिसांनी कारचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला़ विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळील जय भवानी स्टील ट्रेडर्स दुकानासमोर पोलिसांनी ही कार अडविली़ कारमध्ये चालकासह पाच जण होते़ त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळताच त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला़ त्यांची झडती आणि कारची तपासणी करण्यात आली़ कारमधील दोघांकडे पिस्तुल आणि जिवंत काडतूस मिळून आले़ तर, कारमध्ये सुरा, लोखंडी सळई, मिरचीची पूड, दोरी, बॅटरी, चार मोबाईल आणि २ हजार ८२० रुपयांची रोकड आणि कार असे एकूण ३ लाख ८२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़पोलिसांनी विजय उर्फ छंग्गा सरजित बेंडवाल (२२), सत्तू भैरु राजपूत (२०), राहुल अजय उज्जैनवाल (२०), सुमित मनोहर अवचिते (२३) आणि वाहनचालक इरफान नईम शेख (२४) (सर्व रा़ नाशिक) यांना ताब्यात घेतले आहे.पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, धुळे शहर उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, सतिष कोठावदे, मुक्तार मन्सुरी, संदिप पाटील, योगेश चव्हाण, बापू वाघ, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, राहुल पाटील, अविनाश कराड, तुषार मोरे, विवेक सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली़
नाशिकच्या दरोडेखोरांच्या टोळीला धुळ्यात पाठलाग करुन पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:37 IST