रेशन कार्ड नसलेल्या शहरातील कुटुंबांनाही मोफत तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:49 PM2020-05-27T21:49:13+5:302020-05-27T21:49:37+5:30

पुरवठा विभाग : स्वस्त धान्य दुकानांमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन, केशरी कार्डधारकांना लाभ नाही

Free rice for urban families without ration cards | रेशन कार्ड नसलेल्या शहरातील कुटुंबांनाही मोफत तांदूळ

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात रेशनकार्ड नसलेल्या कुटूंबांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ दिला जाणार आहे़ त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे़ तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळाचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे़
राज्य शासनाने १९ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, अशा दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारी करणाऱ्या मजुरांना मे व जून या दोन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनांतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत. अशा नागरिकांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानावरून अर्ज घेऊन त्यांच्याकडेच २९ मेपर्यंत अर्ज आधार क्रमांकाची नोंद करुन जमा करावेत. केशरी कार्डधारकांना ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ देण्याबाबतची कार्यवाही यापूर्वी केलेली असून त्यांना मोफत तांदूळ योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच शासकीय कर्मचारी, नोकरदार वर्ग, शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी मोफत धान्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विस्थापित मजुरांच्या मदतीसाठी आत्मनिर्भर सहाय्यक पॅकेज अंतर्गत धान्य दिले जाईल. जे विस्थापित मजूर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना मे व जून या दोन महिन्यांसाठी पाच किलो मोफत तांदूळ या योजनेअंतर्गत उपलब्ध होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा, तहसीलदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या याद्या तसेच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी मदत केलेल्या लाभार्थ्यांची यादी व स्वस्त धान्य दुकानदारांच्या मदतीने विना शिधा पत्रिका धारकांची केलेली यादी विचारात घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. याशिवाय पोलिस, कामगार, उद्योग विभागांची मदत घ्यावी, असेही सूचीत केले आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ९२ स्वस्त धान्य दुकानदारांची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक झाली़ जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार किशोर कदम (धुळे ग्रामीण), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर), पुरवठा निरीक्षक अधिकारी छोटू चौधरी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सचिव संतोष जैन, उपाध्यक्ष मुरलीधर नागमोती व राजेश ओहळ, कोशागार शाखेचे यशवंत भदाने आदी उपस्थित होते.
या बैठकीत प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे (विना शिधापत्रिकाधारक फॉर्म ) कोरे नमुने देण्यात आले. हा अर्ज वैयक्तिक लाभार्थ्यांनी घेऊन व त्यात आधार क्रमांक टाकून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावयाचा आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना माहीत असलेल्या विना शिधापत्रिकाधारक मजुरांची यादी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे द्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या़
स्वस्त धान्य दुकाननिहाय शासकीय कर्मचारी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येतील. केंद्रप्रमुख व महसूल कर्मचारी स्वस्त धान्य दुकानांच्या मदतीने विना शिधापत्रिकाधारकांची यादी तयार करण्याचे काम करतील. २९ मे पर्यंत ही यादी तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे बिगर शिधापत्रिकाधारकांनी २९ पावेतो अर्ज सादर करावेत.
या बैठकीत दुकानदारांनी विमा कवच, कमिशनबाबत चर्चा केली. तसेच ग्राहक अरेरावी करीत असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
चुकीची माहिती देणाºयांवर कारवाई
चुकीची माहिती देऊन मोफत धान्य घेणाºयांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची असलेली शिधापत्रिका सुद्धा तत्काळ रद्द करण्यात येईल. कोणीही ही एकापेक्षा जास्त वेळा धान्य घेऊ नये म्हणून लाभार्थ्यांच्या रहिवासी क्षेत्राच्या बाहेर संबंधित लाभार्थ्यांना धान्य घेता येणार नाही, अशी उपाययोजना करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी केले आहे.

Web Title: Free rice for urban families without ration cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे