एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:50 AM2019-11-18T11:50:29+5:302019-11-18T11:50:51+5:30

शिरपूर तालुक्यातील अर्थे, वाडी येथील घटना : चोरट्यांचा आता ग्रामीण भागाकडे मोर्चा

Four houses broke into four places in one day | एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोड्या

dhule

Next

शिरपूर : तालुक्यातील अर्थे व वाडी गावात एकाच वेळी चोरट्यांनी हौदास घालून लाखो रूपयांची लुटमार केल्याच्या घटना उघडकीस आली़
१७ रोजी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास वाडी गावात एकाच वेळी २ घरफोड्या झाल्यात़ वाडी येथील दीपक नथेसिंग राजपूत यांचे परिवार दिवाळीच्या सुट्टीमिनित्त गावाला गेले आहेत, त्यामुळे त्यांचे घर गेल्या ८-१० दिवसापासून बंद होते़ मात्र त्यांच्या घराच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील राहतात़ बंद घर असल्यामुळे चोरट्यांनी रात्री ३ वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून प्रवेश मिळविला़ कपाटातील १०-१५ तोळे वजनाचे सोने-चांदीचे दागिण्यांसह रोख १० हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेलेत़ सदर घरात आवाज येत असल्यामुळे दीपक यांचे वडीलांना जाग आली़ त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारील ग्रामस्थ देखील आलेत़ मात्र त्यापूर्वीच २ दुचाकी गाडीवर बसून ६ चोरटे हातात दंडे घेवून पसार झालेत़ तत्पूर्वी, वाडी गावातील चौकातील रामकृष्ण सोनार यांचे सराफी दुकान देखील चोरट्यांनी फोडले, परंतु किती ऐवज गेला ते समजू शकले नाही़
अर्थे येथेही २ घरफोड्या़़़
अर्थे खुर्द येथील साईनगर वसाहतीत आज रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद असलेल्या घराचा फायदा घेऊन किंमती ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्यात़ या घरांच्या शेजारी राहणारे नवल गुजर व जगन्नाथ मिस्त्री यांना घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरपंच व पोलीस पाटील यांना कळविले़
शिरपूर शहादा रस्त्यावर नव्यानेच साईनगर वसाहतीची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यातील रहिवासी हिम्मत हिलालसिंग गिरासे हे पाच दिवसापासून सुरत येथे गेले आहेत तर अर्थे खुर्द येथे विद्युत वितरण कंपनीत वायरमन असलेले स्वप्नील राजेंद्र गिरासे हे देखील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. या बंद घरांचा फायदा घेऊन चोरट्यांनी स्वप्निल गिरासे यांच्या घरातून दोन ते तीन भार चांदी व रोख रक्कम तर हिंमतसिंग गिरासे यांच्या घरातील कपाटामधून चांदीचे व सोन्याचे दागिण्यांसह काही रक्कम चोरून नेली़ तसेच शेजारी भगवान खंडू पाटील यांच्या उभ्या केलेल्या मालवाहतूक वाहनाची बॅटरी देखील बॅटरीही या चोरट्यांनी लंपास केली़
पोलीस पाटील किशोर पाटील यांनी या घटनांची माहिती शिरपूर पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक बुधवंत व अर्थे बीट हवालदार पानपाटील, एम.सी. मालचे यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
एकाच दिवशी अर्थे, वाडी, कुवे, बलकुवे या गावांमध्ये चोरट्यांनी उच्छशद मांडून घरफोड्या केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या चोरट्यांचा माग काढून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Four houses broke into four places in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे