माजी आमदार प्रा.शरद पाटील हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसी आहेत; पण पक्षातील मतभेदामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धुळे ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली आणि विजयी झाले होते. गेल्या वर्षी त्यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती; परंतु त्यांना मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. मध्यंतरी ते राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा होती; परंतु प्रवेश झाला नाही. आता ते परत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. गुरुवारी मुंबई येथील गांधी भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील व अन्य प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश घेणार आहे. माजी आमदार प्रा. शरद पाटील हे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यासह प्रवेश करणार आहे. यावेळी साक्री तालुक्यातील माजी जि.प.सदस्य शिवाजी दहिते यांच्यासोबत भाजपप्रवेश करणारे धाडणे गटाचे रमेश आहिरराव, कासारे येथील उत्तमराव देसले तसेच शेवाळे येथील मधुकर बागुल हे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. प्रा. शरद पाटील यांना धुळे शहर मतदारसंघात मोठे पद मिळणार असल्याची चर्चा आहे.
माजी आमदार प्रा. शरद पाटील आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST