धुळे - पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेचे वेध लागले असून शाळा कधी सुरू होते याची वाट ते बघत आहेत. घरी राहून या लहानग्यांना कंटाळा आला आहे. पालकही पहिली ते चौथीत शिकणाऱ्या त्यांच्या पाल्याना शाळेत पाठवण्यास राजी आहेत. लोकमतने पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता शाळा लवकर सुरू व्हाव्या, अशी मते त्यांनी नोंदवली.
मागील वर्षी मार्चनंतर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. आता अनलॉक झाल्यानंतर सर्व सुरळीत होत आहे. शाळादेखील टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहेत. जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ७ डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र मागील १० महिन्यांपासून घरीच असलेली बच्चे कंपनी आता कंटाळली आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर योग्य काळजी घेऊन पाल्याना शाळेत पाठवणार असून शाळेनेही काळजी घ्यावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
पालकही उत्सुक -
प्रतिक्रिया -
माझा मुलगा इयत्ता दुसरीला आहे. शाळा सुरू झाल्यास सर्व खबरदारी घेऊन पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळेनेही योग्य काळजी घ्यावी. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांचे नुकसान झाले. या काळात त्यांना घरीच शिकवत होतो.
- सुनील पाटील, पालक
माझा मुलगा चौथीला आहे. कोरोनाचे नियम पाळून मुलाला शाळेत पाठवणार आहे. शाळा सुरू झाल्यास एका बाकावर एकच विद्यार्थी बसवणे गरजेचे आहे. मुलाला शाळेत पाठवताना मास्क देणार आहोत. तसेच काळजी घेऊ.
- प्रवीण सोनवणे, पालक
ऑनलाइन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण जास्त प्रभावी असते असे वाटते. प्रत्यक्ष वर्गात शिक्षकांच्या धाकामुळे मुलांचा अभ्यास चांगला होतो. पाल्याला शाळेत पाठवायला उत्सुक आहे. शाळा लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
- रवींद्र सुतार, पालक
कोरोनामुळे घरीच असल्याने मुले कंटाळली आहेत. कोरोना काळात मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. तसेच शाळेतील शिक्षक सतत संपर्कात होते. त्यांचा अभ्यास ते घेत होते. आता मात्र त्यांना शाळेत जायची उत्सुकता लागली आहे.
- सुमित चौधरी, पालक
मुलांना हवी शाळा -
शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहोत. आम्ही मास्क लावतो तसेच साबणाने नियमित हात धुतो. शाळा सुरू झाल्यानंतर दररोज शाळेत जाणार आहे. घरी राहून कंटाळा आला आहे.
- स्वामी भामरे, तिसरीचा विद्यार्थी
घरी ऑनलाइन क्लास सुरू आहेत. शाळा सुरू झाल्यात तर शाळेत जाईल. कोरोना प्रादुर्भावाचे नियम माहीत आहेत. त्यानुसार काळजी घेईल. शाळेत गेल्यानंतर मित्रांना भेटता येईल.
- यश पाटील, चौथीचा विद्यार्थी
अनेक दिवसांपासून मित्र -मैत्रिणींना भेटलेली नाही. घरी राहून आता कंटाळा आला आहे. त्यामुळे शाळा लवकर सुरू व्हाव्यात. शाळा सुरू झाल्यानंतर मैदानावर मनसोक्त खेळणार आहोत.
- जान्हवी सपकाळे, तिसरीची विद्यार्थिनी
शाळा सुरू झाल्यानंतर नियमित शाळेत जाईल. सध्या मोबाइलवर अभ्यास करतो. आई अभ्यास घेते तसेच शाळेतील शिक्षिका फोन करून मार्गदर्शन करतात.
प्रथमेश पवार, चौथीचा विद्यार्थी