लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महापालिकेच्या वरखेडी रोडवर असलेल्या गांडूळ खत प्रकल्पाला मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली़ बुधवारी दुपारपर्यंत अग्निशमन दलाच्या बंबांनी तब्बल ४० फेºया मारून आगीवर नियंत्रण मिळविले असून अजूनही परिसरात प्रचंड धुराचे लोट कायम आहेत़ सुमारे ५०० टन कचरा खाक झाल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली़ वरखेडी कचरा डेपोच्या पुढे काही अंतरावर असलेल्या गांडूळ खत प्रकल्पातील कचºयाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली़ आग लागल्याचे निदर्शनास येताच तेथील कर्मचाºयांनी सहायक आयुक्त शांताराम गोसावी, सहायक आरोग्य अधिकारी रत्नाकर माळी यांना त्याबाबत माहिती दिली़ तोपर्यंत अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले़ मात्र रात्री हवेचे प्रमाण अधिक असल्याने काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले़ त्यामुळे शिरपूर व अमळनेर येथील अग्निशमन बंबांना देखील पाचारण करण्यात आले़ सर्वत्र भडकलेल्या आगीमुळे धुराचे प्रचंड लोट उठत होते़ त्यामुळे बंबांना आगीपर्यंत पोहचण्यात अडचणी निर्माण होत होत्या़ आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह पोलीसांनीही रात्री आगीची पाहणी केली़ या आगीत सुमारे ५०० टन कचरा जळून खाक झाला असून मनपाचे आर्थिक नुकसानही झाले आहे़ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी अजूनही तेथून धुराचे लोट उठत आहेत़
धुळयात गांडूळ खत प्रकल्पातील कच-याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:14 IST
५०० टन कचरा खाक, अग्निशमन बंबांच्या ४० फे-या
धुळयात गांडूळ खत प्रकल्पातील कच-याला आग
ठळक मुद्दे- शिरपूर, अमळनेरहून मागविले बंब- आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली पाहणी- अजूनही धुराचे लोट कायम