मात्र अनेर धरणाचे पाणी फक्त नदीत सोडण्यात आले नसून लवकरच सोडण्यात येईल, असे समजते.
अनेर धरणाचे पाणी सोडल्यानंतर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, जितेंद्र सूर्यवंशी व अनेक पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाटचारीत पाणी सोडल्याची पाहणी केली. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेर धरणाचे पाणी अनेर नदीमध्ये व पाटचारीमध्ये तत्काळ सोडण्यात यावे याबाबतचे पत्र आमदार काशीराम पवार यांनी शिरपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना २० एप्रिल २०२१ रोजी दिले होते. परंतु वरिष्ठ पातळीवरून अहवाल आला नाही या कारणावरून अनेर धरणाचे पाणी अद्यापपर्यंत सोडण्यात आलेले नव्हते.
याबाबत आमदार पावरा यांनी शिरपूर येथे आमदार कार्यालयात तातडीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तालुक्यातील काही पदाधिकारी व शेतकरी यांची शुक्रवारी दि. ३० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता बैठक बोलावली होती. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील, पिळोदा येथील उपसरपंच योगेश बोरसे, घोडसगाव सरपंच हुकूमचंद पाटील, उपसरपंच पितांबर धनगर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. के. राजपूत आदी उपस्थित होते.
या बैठकीत आ. पवार म्हणाले होते की, अनेर धरणात सध्या ६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा असून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व गुराढोरांनादेखील पाण्याची मोठ्या प्रमाणात नितांत गरज आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतरही अधिकारी तातडीने अंमलबजावणी का करत नाहीत, याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही कडक शब्दात सुनावणी केली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या सोमवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नदीत व पाटचारीत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शेतकरी यांनी सोमवारपर्यंत पाणी सोडले नाही तर आम्ही असंख्य शेतकरी आत्मदहन करू असा इशारा दिला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी पाटचारीत पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.