- भूषण चिंचोरे
धुळे - गोवर हा आजार साधारणपणे लहान बालकांना होण्याचा धोका असतो; मात्र गोवर फक्त लहान बालकांनाच होतो असे नाही. कोणत्याही वयोगटातील नागरिकांना तो होऊ शकतो. ताप येणे, चेहऱ्यावर लाल पुरळ येणे अशाप्रकारची लक्षणे दिसतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
गोवर व रुबेला हे विषाणूजन्य आजार आहेत. लहान मुलांना हे आजार अधिक प्रमाणात होतात. गोवर व रुबेला निर्मूलनासाठी २०१८ साली राज्यात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे लहान मुलांना गोवर होण्याचे प्रमाण घटले आहे.
असे केले जाते निदान
१ कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गोवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
२ त्यामुळे पुरळ आल्यापासून सात दिवसांच्या आत रुग्णाचे रक्तजल नमुने तसेच घशाचा स्वॅब किंवा लघवीचे नमुने तपासले जातात.
३ आरोग्य विभागामार्फत प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करून निदान केले जाते.
... तर डॉक्टरांना दाखवा
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात सुरुवातीला ताप येतो. तापासोबतच खोकला, नाक वाहते तसेच डोळ्यांची जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात.
- तीन ते पाच दिवसानंतर चेहऱ्यावर लाल पुरळ येतात. अशी लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.
गोवर, रुबेलाचे १०० टक्के लसीकरण
- २०१८ साली गोवर - रुबेलाची लसीकरण मोहीम शासनाने सुरु केली होती.
- या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
- जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती.
केवळ लहान बालकांनाच गोवर होऊ शकतो असे नाही. सर्वच वयोगटातील नागरिकांना हा विषाणूजन्य रोग होऊ शकतो. व्हायरल फ्लू प्रमाणे याची लक्षणे असतात. जास्त प्रमाणात ताप व चेहऱ्यावर पुरळ येणे असा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी