धुळे : दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मंगळवारी धुळ्यात विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारींनी जोरदार स्वागत केले. पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून शेतकरी, कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाशिक येथे जमले. सोमवारी नाशिक येथून भव्य रॅलीने हे शेतकरी दिल्लीला निघाले आहेत. शेतकऱ्यांच्या या भव्य रॅलीचे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धुळ्यात आगमन झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील रेसीडेन्सी पार्क हाॅटेलजवळ रॅलीचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर गुरूवाद्वाराजवळ बाबा धिरजसिंग यांनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.रॅलीचे नेतृत्व करणारे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अशोक ढवळे, डाॅ. अजीत डवले, राज्याचे अध्यक्ष किसन गुजर, ज्येष्ठ नेते माजी आमदार जी. पी. गावीत यांच्यासह शेतकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी जमीअत उलेमा हिंदच्या पदधिकारींनी देखील जोरदार पुष्पवृष्टी करीत शेतकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शेतकऱ्यांची रॅली सायंकाळी ६ वाजता शिरपूरकडे रवाना झाली.यावेळी माहिती देताना किसान सभेचे राज्य सचिव राजु देसले यांनी सांगितले की, शेतकरी विरोधी तीन कायदे आणि प्रस्तावित विजबील कायदा सरकारने रद्द करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हे कायदे करताना शेतकऱ्यांचे मत घेतले नसल्याने उणिवा आहेत. याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीतील आंदोलनात ३३ पेक्षा अधीक शेतकरी शहीद झाले आहेत. तरीदेखील शेतकरी चर्चा करायला तयार नाही. आंदोलनात चीन, पाकिस्तानचा हात असल्याचे सांगून सरकार दिशाभूल करीत आहे. परंतु हे आंदोलन राजकीय नसून शेतकऱ्यांचे आहे. शेतकरी लढतो आहे. त्यामुळे या आंदोलनाला बळ देण्यासाठी राज्यातून हजारो शेतकरी दिल्लीला जात आहेत. ठिकठिकाणी स्वागत होत असून शेतकरी रॅलीमध्ये सामील होत आहेत. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि कायदे मागे घ्यावेत अशी आमची मागणी आहे. मध्यप्रदेशच्या सिमेवर अडवले तरी आम्ही मागे हटणार नाहीत. त्याच ठिकाणी आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असा इशारा राजु देसले यांनी दिला.महाविकास आघाडी, वंचीत बहुजन आघाडी, विविध कामगार संघटना, शेतकरी संघटना, सामाजीक संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांच्या या जत्थाचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, युवराज करनकाळ, डाॅ. दरबारसिंग गिरासे, मुकूंद कोळवले, हेमंत मदाने, बानुबाई शिरसाठ, समाजवादी पक्षाच्या नेत्या कल्पना गंगवार, नगरसेवक आमीन पटेल, इमाम सिद्दीकी, काॅ. पोपटराव चाैधरी, एस. यु. तायडे, हरिचंद्र लोंढे, नगरसेवक साबीर खान, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अविनाश पाटील, संदीप देवरे, वंचितचे जिल्हाध्यक्ष अॅड. चक्षुपाल बोरसे, योगेश जगताप, पोपटराव चौधरी, कॉ. एल. आर. राव, मनिष दामोदर, ईश्वर पाटील, वसंत पाटील, प्रशांत वाणी, राकेश अहिरे, सिध्दांत बागुल, सिध्दार्थ साठे, शरद वेंदे, देवेंद्र पवार, प्रकाश चव्हाण, प्रकाश पाटील यांच्यासह धुळेकरांनी शेतकऱ्यांचे स्वागत करुन आंदोलनाला पाठिंबा दिला.२०० पेक्षा अधिक वाहनांचा ताफानाशिक येथून तब्बल २०० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा दिल्लीला रॅलीने रवाना होत आहे. या रॅलीत विविध शेतकरी संघटनांसह, विविध कामगार संघटना, डावी आघाडी, सिटू , समाजवादी आदी सहभागी झाले आहेत. प्रत्येक तालुक्यातून शेतकरी, कामगार, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होत असल्याने शेतकऱ्यांची ताकद प्रत्येक तासाला वाढत असल्याचे चित्र आहे. शिरपूर तालुक्यातून देखील शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत.सत्यशाेधक संघटनेच्या तरुणांची घोषणाबाजीसत्यशोधक विद्यार`थी संघटनेच्या तरुणांनी देखील आंदोलनक शेतकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. जय जवान, जय किसान, इन्कीलाब जिंदाबाद यासह इतर घोषणाबाजी, क्रांतीकारी गिते गावून शेतकरी आंदोलनाची धुळे शहरात वातावरण निर्मिती केली.
आंदोलनासाठी दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांचे धुळ्यात जोरदार स्वागत, शिरपूरला मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:18 IST