मराठी भाषा जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:25+5:302021-02-27T04:48:25+5:30

भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी अशी वैभव संपन्न भाषा म्हणून मराठी परिचित आहे. ...

Everyone has a responsibility to preserve the Marathi language | मराठी भाषा जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी

मराठी भाषा जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी

Next

भाषांचा भावार्थ मराठी,

बात मराठी, साथ मराठी

जगण्याला या अर्थ मराठी

अशी वैभव संपन्न भाषा म्हणून मराठी परिचित आहे. मराठीत विपूल ग्रंथसंपदा आहे. अशा या मराठी भाषेचे जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी अपेक्षा मराठीतील साहित्यिकांनी व्यक्त केली असून, त्याचबरोबरच या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साहित्यिकांनी वरील अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत.

मराठी ही भाषा समृद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षात इंग्रजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भाषेला कोणाचा विरोध नाही. मात्र आपल्या मातृभाषेचे संवर्धन, जतन करण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण झाले पाहिजे. जास्तीत जास्त साहित्याचे वाचन झाले पाहिजे. बोलीभाषेतील लोकवाड‌्:मय, लोककला, मौखिक साहित्य, तथा ओवी वाड‌्:मयाची जपणूक म्हणजेच ते ते लिखित स्वरूपात आणून ई-साहित्य म्हणून त्याला अभ्यासण्यासाठी प्रकाशित करणे गरजेचे आहे. अशा या वैभवसंपन्न भाषेला राजभाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही जिल्ह्यातील साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. तथापी केंद्र सरकारच्या अखत्यारितील संबंधित संस्थेकडून असा दर्जा जाहीर करण्यात विलंब होत आहे, हे खेदजनक आहे. मराठी भाषेलाही लवकरात लवकर राजभाषेचा दर्जा मिळावा.

- डॉ. फुला बागूल,

ज्येष्ठ साहित्यिक, शिरपूर

प्राथमिक शिक्षण बोलीभाषेत व उच्च शिक्षण मराठी भाषेत असावे. जेणेकरून, मराठी जागतिक पातळीवर ज्ञानभाषा होण्यास मदत होईल. जगातील विविध भाषांमधील समाजोपयोगी व ज्ञानसमृद्ध साहित्य मराठीत भाषांतरित होणे गरजेचे आहे.

- डॉ. सदाशिव सूर्यवंशी,

अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ.

मराठी भाषा वैभव संपन्न आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मातृभाषेतूनच विचार व्यक्त करीत, भाषेचे जतन केले पाहिजे.

- प्रा. शशिकला पवार,

लेखिका, धुळे

मराठीचे प्रभावक्षेत्र विस्तारीत कसे जाईल याबद्दल गंभीरपणे आपण विचार करायला हवा. आपल्या रोजच्या जगण्याच्या सगळ्याच अंगामधून मराठीचा सर्व सामर्थ्यानिशी संचार जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत मराठीचा लौकीक वाढणार नाही.

- प्रा.डॅा. आशुतोष पाटील,

मराठी विभाग प्रमुख उमवि.

देशातील प्रत्येक राज्याने आपली भाषा सुरक्षित ठेवलेली आहे. त्यामानाने महाराष्ट्रात मराठी भाषेचे संवर्धन करण्याचा कमी प्रमाणात प्रयत्न झालेला आहे. भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढावी.

- सुभाष अहिरे,

अहिराणी साहित्यिक,धुळे

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोली भाषांचे जतन झाले पाहिजे. मराठीत वाचकांची संख्या वाढली पाहिजे. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून हे प्रयत्न व्हावे. नवलेखक, कवींना प्रोत्साहान देण्याची गरज आहे.

- रमेश बोरसे,

साहित्यिक,धुळे

Web Title: Everyone has a responsibility to preserve the Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.