धुळे : भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे. हा सन्मान सार्थ ठरविण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारावर आहे. सुदृढ आणि मजबूत लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, सुरेखा चव्हाण, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार गायत्री सैंदाणे, अपर तहसीलदार संजय शिंदे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यादव यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांसह उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केल्यावर आपल्याला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. हा मतदानाचा पवित्र हक्क निर्भयपणे, सक्षमपणे मांडण्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी हा असून त्याचा पुढील दिवस हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रजासत्ताकाचा, लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक बनविण्यासाठी आपण कटिबध्द राहिले पाहिजे, अशा आशयाचे घोषवाक्य यावर्षी दिले आहे. लोकशाहीचे विकेंद्रीकरण करत आपण आता ग्रामपातळीपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविणे हा लोकशाहीचा खरा धर्म आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे सुरू असलेले निवडणूक विभागाचे काम कौतुकास्पद आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले. तहसीलदार श्रीमती सैंदाणे यांनी प्रास्ताविक केले. अव्वल कारकून वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी आभार मानले. प्रारंभी सुभाष कुलकर्णी यांनी गीत सादर केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मतदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.