निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावरील निजामपूर व परिसरात आता विकास कामे सुरू असली तरी निजामपूर शहर कचरामुक्त होण्यासाठीच्या उपाययोजना व विजेच्या स्वतंत्र फिडरसाठी शर्तीचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत. जॉगिंग ट्रॅक आणि सर्वांसाठी जिमची उभारणी देखील अपेक्षित आहे. आचारसंहिता संपल्याबरोबर विकास कामांना मुहूर्त लाभला असून आता गती येत आहे.निजामपूर गावासाठी ग्रामपालिकेने ग्रामनिधीतून शवपेटी उपलब्ध केली आहे. यामुळे लोकांची सुविधा होईल, असे सरपंच सलीम पठाण यांनी सांगितले. गावात ठराविक ठिकाणी हायमास्ट लावले गेले. सध्याच्या शववाहिनीऐवजी नवीन शववाहिनी गाडीची खूप आवश्यकता जाणवते आहे. ते देण्याची तयारी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भार्गव यांनी दाखविली आहे. निजामपूरच्या अमरधाम येथील अंत्यविधी शेडजवळ ७ लाख खर्चून अजून एका शेडचे बांधकाम सुरू आहे. मिलिंद भार्गव यांनी निधी उपलब्ध केला असून काम परेश पाटील यांनी सुरू केले आहे. सरपंच सलीम पठाण यांनी नुकतीच बांधकामाची पाहणी केली आहे. येथे बैठक व्यवस्थेचे बांधकाम पण होणार आहे. यापूर्वी जे.के. नगरात २५ लाख रुपये खर्चातून रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. निजामपूर येथील खंडेराव महाराज मंदिर व गणपती मंदिर चौकात १० लाख रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसविणे आणि राणे नगरात ७ लाख रुपये चौक सुशोभीकरणासाठी निधी मंजूर असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मागणीकडे लक्ष देत राणे नगरात ओपन स्पेसमध्ये १० लाख रुपये खर्चून ओपन जिम आणि ७ लाख रुपये जॉगिंग ट्रॅकसाठी निधी उपलब्ध केला असल्याने नागरिकांची सोय होणार आहे, असे मिलिंद भार्गव, परेश पाटील यांनी सांगितले. निजामपूर शहर कचरामुक्त होणे गरजेचे आहे. निजामपूर व जैताण ेगावांचा एकच वीज फिडर आहे. निजामपूरसाठी स्वतंत्र वीज फिडर व्हावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव आटोक्यात येईल. ही मागणी पूर्ण करण्याचा मानस मिलिंद भार्गव यांनी व्यक्त केला आहे. यासह त्यांनी उभरांडी गावासाठी ३१ लाखाचा निधी अमरधाम, बैठक व्यवस्था, संरक्षक भिंत, अंत्यविधी शेड, रस्ता काँक्रीटीकरण या विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय परिसरात आखाडे, खुडाणे, भामेर, उभरांडी, कळंभीर येथेही प्रत्येकी ४७ लाखाचा विकास निधी आणला आहे. टेंडर पूर्ण होऊन लवकरच कामांना गती मिळेल, असे सांगण्यात आले.
अखेर विकास कामांना मुहूर्त सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:44 IST